

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : रशियाचे क्रूड तेल (Russian crude oil) घेऊन भारताकडे येणार्या एका टँकरने बाल्टिक समुद्रात आपला मार्ग अचानक बदलला आहे. यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील तेल व्यापारात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर नवीन निर्बंध लादल्यामुळे भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांमध्ये अनिश्चितता वाढली आहे, असे ब्लूमबर्गच्या बातमीत म्हटले आहे.
फ्युरिया नावाच्या या जहाजाने रशियाच्या प्रिमोर्स्क बंदरातून सुमारे 7,30,000 बॅरल युरल्स क्रूड तेल भरले होते ते गुजरातच्या सिक्का बंदराकडे येत होते. मात्र, डेन्मार्क आणि जर्मनी दरम्यानच्या फेहमार्न बेल्टजवळ पोहोचताच टँकरने आपला मार्ग बदलला आणि नंतर त्याचे गंतव्यस्थान इजिप्तमधील पोर्ट सैद असे अपडेट केले.
भारतीय कंपन्यांसमोर नवी आव्हाने
रोसनेफ्ट आणि लुकऑईलसारख्या प्रमुख रशियन ऊर्जा कंपन्यांना लक्ष्य करणारे अमेरिकेचे हे निर्बंध 21 नोव्हेंबरपर्यंत सर्व चालू व्यवहार थांबवण्याचे बंधन घालतात. यामुळे भारताच्या रशियन तेलाच्या मोठ्या प्रमाणात खरेदी क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.