

Russia-Ukraine war Putin helicopter escape from drone attack
मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे नुकतेच एका थरारक हल्ल्यातून बचावल्याची माहिती आहे. यूक्रेनच्या एका ड्रोनने थेट पुतिन यांच्या हेलिकॉप्टरच्या मार्गावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र रशियन हवाई संरक्षण यंत्रणांनी वेळेवर हस्तक्षेप करत संभाव्य धोका टाळला.
ही घटना कुर्स्क सीमावर्ती भागात रात्रीच्या वेळेस घडली. पुतिन तिथे दौऱ्यावर गेले होते. रशियन अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना एक ड्रोन त्या मार्गावर येताना आढळून आला. लगेचच रशियन हवाई संरक्षण दलाने ती ड्रोन निष्प्रभ केली.” पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही आणि त्यांच्या ताफ्याचेही कोणतेही नुकसान झालेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
रशिया-युक्रेन युद्धात कुर्स्क हे क्षेत्र गेल्या काही महिन्यांपासून संघर्षाचे केंद्रबिंदू ठरले आहे. एप्रिलमध्ये रशियाने दावा केला होता की त्यांनी यूक्रेनियन फौजांना या भागातून परत पाठवले आहे. मात्र युक्रेनने या दाव्यांना विरोध केला होता.
याच पार्श्वभूमीवर पुतिन यांचा दौरा 'शक्तीप्रदर्शन' म्हणून पाहिला जात होता. दरम्यान, रविवारी सकाळी रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला होता.
या हल्ल्याच्या घटनेनंतर हा हल्ला पुतिन यांच्यावर थेट हल्ला होता की मानसिक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता याची माहिती रशियन गुप्तचर यंत्रणा घेत आहेत. सध्या युक्रेनकडून या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र याआधीही त्यांनी रशियातील सामरिक स्थळांवर ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत.
दरम्यान, रशियाने अमेरिका व युरोपीय देशांच्या ताज्या शस्त्रसंधी प्रस्तावांना नकार दिला आहे. परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आरोप केला आहे की, पश्चिम देश ही चर्चा केवळ युक्रेनला पुन्हा शस्त्रसज्ज करण्यासाठी वेळ खरेदी करण्यासाठी वापरत आहेत.
त्याचवेळी युक्रेन आणि त्यांचे सहयोगी देश असा दावा करत आहेत की उत्तर कोरियाने कुर्स्क पुन्हा ताब्यात घेण्यासाठी रशियाच्या मदतीला 12000 सैनिक पाठवले आहेत. रशियाने मात्र यावर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशिया-युक्रेन युद्धाची अधिकृत सुरुवात 24 फेब्रुवारी 2022 रोजी झाली, जेव्हा रशियाने युक्रेनवर सर्व बाजूंनी पूर्णपणे आक्रमण केले. या आधी 2014 पासूनच दोन्ही देशांमध्ये डोनेत्स्क, लुहान्स्क (डोनबास क्षेत्र) आणि क्रिमिया या भागांमध्ये संघर्ष सुरू होता.
2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताब्यात घेतला आणि डोनबासमध्ये रशिया समर्थित बंडखोर सक्रिय झाले. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाचे मोठ्या प्रमाणात आक्रमण सुरू झाले. 2023 ते 2024 याकाळात दोन्ही बाजूंनी मोठ्या हल्ल्यांची मालिका झाली.
ड्रोन युद्ध, आणि पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला मदत करण्यात आली. सध्याही युद्ध सुरू असून अनेक सीमावर्ती भागांत (कुर्स्क) तणाव कायम आहे. आजघडीला 25 मे 2025 रोजी युद्ध सुरू होऊन 3 वर्षे आणि 3 महिने झाले आहेत.