Drone Attack on Russia | रशियावर १६०० ड्रोन्सचा हल्ला; तेल शुद्धीकरण प्रकल्प उद्ध्वस्त

युक्रेनकडून पहिल्यांदाच बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर
Drone Attack on Russia  |
Drone Attack on Russia | रशियावर १६०० ड्रोन्सचा हल्ला
Published on
Updated on

मॉस्को; वृत्तसंस्था : रशियातील संसदीय निवडणुकीच्या अंतिम दिवशी युक्रेनने मॉस्कोसह रशियातील विविध भागांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईत १६०० ड्रोन्सचा वापर करण्यात आला असून, युक्रेनने युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच स्वतः विकसित केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. हल्ल्यांमध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच मॉस्कोतील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे नुकसान झाले आहे.

हल्ल्यात ‘पेलिकन’ या अल्प पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे ३५० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ते थेट मॉस्कोपर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र, युक्रेनने ‘फ्लेमिंगो’ या दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राचाही वापर केल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. या क्षेपणास्त्राची रेंज रशियाच्या आतपर्यंत लक्ष्य भेदण्यासाठी पुरेशी आहे. मॉस्कोतील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला हानी पोहोचल्याचे सोब्यानिन यांनी सांगितले. युक्रेनने रशियाच्या ऊर्जा सुविधांवर ड्रोन हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे.

निवडणुकीत हस्तक्षेपाचा आरोप

रशियन अधिकाऱ्यांनी या हल्ल्यांचा संबंध संसदीय निवडणुकीशी जोडला आहे. सोब्यानिन यांनी युक्रेनवर निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. रशियात शुक्रवारी सुरू झालेल्या तीन दिवसीय संसदीय निवडणुकीचा रविवारी अंतिम दिवस होता. ही निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनविरोधात पूर्ण क्षमतेने युद्ध सुरू झाल्यानंतरची पहिली संसदीय निवडणूक आहे. रशियाने युक्रेनच्या ताब्यातील काही भागांमध्येही मतदान आयोजित केले आहे. मात्र, या प्रदेशांवरील रशियाच्या दाव्याला युक्रेन आणि अनेक देश मान्यता देत नाहीत.

मॉस्कोवर डागली ४५० ड्रोन

मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी १,६०० हून अधिक ड्रोन पाडल्याचा दावा केला असून त्यापैकी सुमारे ४५० ड्रोन मॉस्कोच्या दिशेने येत होते, असे म्हटले आहे. मात्र, या आकडेवारीची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. मॉस्कोच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत ४४ वर्षीय महिला आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. एका ड्रोनच्या धडकेनंतर २१ मजली निवासी इमारतीला आग लागली. त्यानंतर सुमारे ४०० नागरिकांना इमारतीतून सुरक्षित बाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news