

पुढारी ऑनलाईन :
युक्रेनच्या म्हणण्यानुसार रशियाने हल्ला केलेले ड्रोन चेर्नोबिलच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा कवचावर पडले आहे. या हल्ल्यानंतर मात्र प्रकल्पातील किरणोत्सर्ग पातळी सामान्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हंटलय की रशियाने चेरनोबिलमधील अणुभट्टीवर ड्रोनने हल्ला केला आहे.
झेलेन्स्की यांनी या घटनेचे वर्णन दहशतवादी हल्ला म्हणून केले आहे आणि म्हटले आहे की अणुस्थळांना लक्ष्य करणे धोकादायक आहे. तथापि, राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याकडून हल्ल्याची पुष्टी झाल्यानंतर, अग्निशमन, सुरक्षा अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यात आल्याचे सांगितले आहे.
युद्धादरम्यान, युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेच्या धोक्यांवर भर देत त्यांनी सांगितले की, निष्काळजीपणाला जागा नाही. IAEA ने नेहमीच उच्च सतर्क राहणे गरजेचे आहे.
२६ एप्रिल १९८६ रोजी सकाळी चेरनोबिल अणुऊर्जा केंद्रात स्फोट झाला. यानंतर, त्याचे अतिशय भयानक परिणाम समोर आले. चेरनोबिल युक्रेन आणि बेलारूसच्या सीमेजवळ आहे. २६ एप्रिल १९८६ रोजी चेरनोबिल अणुऊर्जा केंद्रावर सुरक्षा चाचणी घेण्यात आली. हे इतके सामान्य मानले जात होते की प्रकल्पाच्या संचालकांनी तिथे येण्याची तसदीही घेतली नाही. अनपेक्षित वीज निर्मिती आणि वाफेच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले, ज्यामुळे अणुभट्टी फुटली, त्यामुळे चाचणी लवकरच नियंत्रणाबाहेर गेली. हा इतिहासातील सर्वात मोठा अणु अपघात मानला जातो.
इतिहासातील सर्वात भयानक अणु अपघात मानल्या जाणाऱ्या चेरनोबिल आपत्तीत ३१ लोकांचा तात्काळ मृत्यू झाला. यामध्ये स्वच्छते दरम्यान तीव्र किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊन मृत्युमुखी पडलेल्या २८ कामगार आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या घटनेमुळे कर्करोगामुळे हजारो लोकांचा अकाली मृत्यू झाला असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे किरणोत्सर्ग वर्षानुवर्षे पसरत राहिले.