

बर्लिन / वॉशिंग्टन : रशिया येत्या ६० दिवसांच्या आत पृथ्वीच्या कक्षेत अण्वस्त्रधारी उपग्रह प्रक्षेपित करण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा पाश्चात्त्य गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. यामुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या हजारो उपग्रहांना मोठा धोका निर्माण झाला असून, जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जर्मनीच्या डब्ल्यूडीआर, एनडीआर या वृत्तवाहिन्या आणि ‘स्यूडडॉईचे झायतुंग’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या संयुक्त शोध अहवालानुसार, रशियाने ‘स्पुतनिक-एस’ नावाचा अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम उपग्रह तयार केला आहे. गेल्या काही वर्षांपासून मॉस्को परिसरात ठेवण्यात आलेला हा उपग्रह डिसेंबर महिन्यातच अवकाशात सोडला जाऊ शकतो, असा अंदाज जर्मन लष्कराच्या अंतराळ विभागाने व्यक्त केला आहे.
चीनमधील शेंझेन येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अण्वस्त्र नियंत्रणावर चर्चा झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत हा अहवाल समोर आला आहे. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी हे वृत्त धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तर नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी नाटोच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करण्याची ग्वाही देत अंतराळातील धोक्यांना तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
रशियाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी हे अहवाल बिनबुडाचे आणि गांभीर्याने घेण्यायोग्य नसल्याचे म्हटले आहे. बर्लिनमधील रशियन दूतावासाने हा रशियाविरोधी अपप्रचार असून आमचा अंतराळ कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे.
१९६७ च्या बाह्य अवकाश करारानुसार अवकाशात अण्वस्त्रे तैनात करण्यास बंदी आहे. जर रशियाने अवकाशात अणुस्फोट घडवला, तर त्यातून निघणाऱ्या किरणोत्सर्ग आणि विद्युतचुंबकीय लहरींमुळे जीपीएस, बँकिंग व्यवहार, हवामान अंदाज, दळणवळण आणि युक्रेन युद्धात वापरले जाणारे 'स्टारलिंक' नेटवर्क पूर्णपणे ठप्प होऊ शकते.