

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुजोरीला शह देण्यासाठी रशिया, भारत आणि चीनची (रिच) एकजूट होण्याची दाट शक्यता आहे. शांघाय परिषदेच्या निमित्ताने तिघे राष्ट्रप्रमुख एकाच मंचावर येवून अमेरिकेला आव्हान देणार आहेत. शांघायसह ब्रिक्स देशांमध्ये डॉलरऐवजी स्थानिक चलनात व्यवहार करण्याबाबत मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची चिन्हे आहेत.
भारताने अमेरिकन डॉलरला बाजूला सारत ब्रिक्स देशांसोबत केवळ भारतीय रुपयात व्यापार करण्यासाठी प्राधान्य देण्याचे निश्चित केले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या संभाव्य टॅरिफला (आयात शुल्क) प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आंतरराष्ट्रीय व्यापारात रुपयाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सीमापार व्यवहार सुलभ केले आहेत. भारत, रशिया, चीनसह अन्य देशही ट्रम्प टॅरिफखाली भरडले जात आहेत. त्यामुळे या तिन्ही देशांची रिच आघाडी आकारास येत असून ट्रम्प यांची हेकेखारी मोडीत काढण्यासाठी स्थानिक चलनात व्यापारास चालना देण्याबाबत या तिन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये एकवाक्यता होण्याची शक्यता आहे.
बँका आता इतर देशांतील आयात-निर्यात व्यवसायांना विशेष व्होस्ट्रो खात्यांद्वारे रुपयात व्यापार सेटलमेंट करण्याची परवानगी देऊ शकतात. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर मोदी सरकारने रुपया मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. याकडे व्हाईट हाऊसच्या धोरणांविरुद्ध उचललेले प्रत्युत्तराचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.