

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेत शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणार्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अमेरिकन दूतावासाने एक महत्त्वाचा आणि कठोर इशारा दिला आहे. अमेरिकेतील कायद्यांचे उल्लंघन केल्यास व्हिसा रद्द होण्यापासून ते हद्दपारी आणि भविष्यात प्रवासावर बंदी घालण्यापर्यंतच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेत प्रवेश मिळवणे हा हक्क नसून एक सुविधा आहे, याची आठवणही करून देण्यात आली आहे.
अमेरिकन दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे की, अमेरिकेतील कायदे मोडल्यास तुमच्या व्हिसावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जर तुम्हाला अटक झाली किंवा तुम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले, तर तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो, तुम्हाला देशाबाहेर काढले जाऊ शकते आणि भविष्यात अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास तुम्ही अपात्र ठरू शकता. नियमांचे पालन करा आणि आपला प्रवास धोक्यात आणू नका. यातून अमेरिकेने इमिग्रेशन नियमांबद्दल आपली कठोर भूमिका स्पष्ट केली आहे.
हा इशारा अशावेळी आला आहे, जेव्हा अमेरिकेतून भारतीयांच्या हद्दपारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत तब्बल 388 भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले. यापैकी अनेकजण डंकी नावाच्या धोकादायक आणि बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत दाखल झाले होते. हद्दपार झालेल्यांमध्ये पंजाब (126), हरयाणा (110) आणि गुजरात (74) येथील नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे.