

तेहरान/ वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात दोन्ही देशांमध्ये पुन्हा गोळीबार आणि नौदलाची कारवाई झाली. अमेरिकेने इराणशी संबंधित दोन जहाजांवर कारवाई केल्याचा दावा केला असून, इराणने युद्धविरामाचे उल्लंघन म्हटले आहे.
इराणच्या ‘फार्स’ वृत्तसंस्थेनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीत इराणी दल आणि अमेरिकी नौदल यांच्यात शुक्रवारी विखुरलेल्या चकमकी झाल्या. अमेरिकन लष्कराने इराणकडे जाणार्या दोन जहाजांवर हवाई हल्ला करून त्यांना परत फिरण्यास भाग पाडल्याचे सांगितले. या हल्ल्यात एका जहाजावरील कर्मचार्याचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी आणि सहा जण बेपत्ता असल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे.
संयुक्त अरब अमिरातीने शुक्रवारी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि तीन ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा केला.
अमेरिकेने युद्ध थांबवण्यासाठी इराणसमोर प्रस्ताव ठेवला असला, तरी तेहरानने अद्याप स्पष्ट उत्तर दिलेले नाही. दरम्यान, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने चीन आणि हाँगकाँगमधील काही कंपन्या व व्यक्तींवर निर्बंध जाहीर केले आहेत. या कंपन्या इराणच्या ‘शहेद’ ड्रोन कार्यक्रमाला मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.