सिंगापूर; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौर्यात उभय देशांमध्ये विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. यावेळी मोदी यांनी सिंगापूरमधील विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसोबत चर्चा केली. सिंगापूरमधील कंपन्यांसाठी रेड कार्पेट तयार असून, आम्ही आर्थिक सुधारणा करू, तुम्ही भारतात गुंतवणूक करा, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.
ब्रुनेई येथून मोदी यांचे बुधवारी सिंगापूरमध्ये आगमन झाले. त्यावेळी त्यांचे महाराष्ट्रीयन सांस्कृतिक परंपरेने ढोलाच्या वाद्याने अनिवासी भारतीयांनी स्वागत केले. 2018 नंतर मोदी यांचा सिंगापूरचा हा पहिलाच दौरा आहे. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी मोदी यांचे जंगी स्वागत केले. मोदी यांच्यासोबत त्यांनी स्नेहभोजन केले.
या दौर्यात मोदी यांनी भारत-सिंगापूरमध्ये विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार करण्यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी केली. त्यांनी सिंगापूरच्या विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. डिजिटायजेशन, कौशल्य विकास, शाश्वत विकास, आरोग्य, उत्पादन, दळणवळण आदी विविध क्षेत्रांतील करारांवर स्वाक्षरी केली. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पहिला एमओयू करण्यात आला. यानंतर सायबर सिक्युरीटी, 5 जी, सुपर कम्युटिंग, कृत्रिम बुद्धिमता आदी उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्येही परस्परांना सहकार्य करण्यात येणार आहे. सिंगापूरच्या कंपन्या सेमिकंडक्टर प्रकल्पामध्येही भारतात गुंतवणूक करण्याबाबत यावेळी सहमती झाली. हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातील मनुष्यबळ विकासासाठीही विशेष करार करण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रांमध्येही दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिंगापूरच्या भरभराटीचे मोदी यांनी यावेळी कौतुक केले. आपल्या देशापासून प्रेरणा घेऊन आम्हाला भारतात अनेक सिंगापूरची निर्मिती करायची आहे, अशी भावना मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स यांच्याकडे व्यक्त केली.