

बीजिंग; वृत्तसंस्था : अमेरिकेचे दोन मोठे शत्रू देश एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात नेमकी काय चर्चा होत असेल? हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीनने आयोजित केलेल्या भव्य परेडसाठी बीजिंगमध्ये दाखल झाले. आता या भेटीदरम्यानची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अधिकृत बैठकीपूर्वी झालेली एक अनपेक्षित बातचीत हॉट माईकवर रेकॉर्ड झाली आहे. मनुष्य 150 वर्षे जगू शकतो, ज्यामुळे जगभरात चर्चांना उधाण आले आहे.
ही घटना तेव्हा घडली जेव्हा पुतीन आणि जिनपिंग परेड समारंभाकडे खांद्याला खांदा लावून जात होते. त्यावेळी एका हॉट माईकवर त्यांचे संभाषण रेकॉर्ड झाले. या चर्चेत दोन्ही नेते अवयव प्रत्यारोपण आणि माणसाच्या 150 वर्षांपेक्षा जास्त जगण्याच्या शक्यतेवर बोलत होते. जेव्हा पुतीन आणि शी तियानमेन चौकाकडे जात होते, तेव्हा पुतीन यांचे भाषांतरकार चिनी भाषेत बोलताना ऐकू आले, बायोटेक्नॉलॉजी सातत्याने विकसित होत आहे.
भाषांतरकाराने पुढे म्हटले की, मानवी अवयव प्रत्यारोपण सोपे झाले आहे. तुम्ही जितके जास्त काळ जगाल, तितके तुम्ही तरुण व्हाल आणि अमरत्वही मिळवू शकाल. कॅमेर्याच्या पलीकडे असलेले शी जिनपिंग चिनी भाषेत उत्तर देताना ऐकू आले, काही लोकांचा अंदाज आहे की, या शतकात मनुष्य 150 वर्षे जगू शकतो. विशेष म्हणजे, यावेळी समोर उपस्थित असलेले उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे स्मितहास्य करताना दिसले. यापुढील संभाषण मात्र रेकॉर्ड होऊ शकले नाही.