

Prince Andrew The Epstein File:
ब्रिटनचे राजा चार्ल्स यांनी गुरूवारी आपला छोटा भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांचं प्रिन्स हे पद काढून घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांना विंडसोरचा त्यांचा राजवाडा आणि बकिंगहम पॅलेस देखील सोडण्यास सांगितलं आहे. ब्रिटनच्या राज घराण्यानं अँड्र्यू यांच्यासोबतचे आपले सर्व संबंध तोडून टाकले आहेत.
जेफ्री एपस्टीन स्कँडलमध्ये अँड्र्यू यांचं नाव आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. जेफ्री एपस्टीनवर अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. तसंच त्यांनी अनेक धनाड्य आणि बलाढ्य व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवल्याचा देखील आरोप होता. एपस्टीनच्या डायरीत एलन मस्क पासून डोनाल्ड ट्रम्प पर्यंत अनेक बड्या लोकांची नावं आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे ६५ वर्षाचे लहान भाऊ अँड्र्यू आणि दिवंगत क्वीन एलिझाबेथ यांचे दुसरे पुत्र हे त्यांच्या वागणुकीमुळं वादात अडकले होते. त्यांचे नाव सेक्स ऑफेंडर एपस्टीनशी जोडलं गेल्यामुळं ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या महिन्याच्या सुरूवातीला अँड्र्यू यांना त्यांची ड्युक ऑफ यॉर्क ही पदवी वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती.
आता चार्ल्स यांनी अँड्र्यू यांच्यावर अधिक कडक कारवाई करत त्यांच्याकडून त्यांच्या सर्व पदव्या काढून घेतल्या आहेत. त्यांना आता अँड्र्यू माऊटबॅटन विंडसोर संबोधण्यात यावं असं कळवण्यात आलं आहे. याबाबत बकिंगहम पॅलेसनं अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे.
त्याचबरोबर त्यात अँड्र्यू यांना वेस्ट लंडनमधील विंडसोर इस्टेटमधील त्यांचे रॉयल लॉज मेंशन देखील खाली करायला सांगितलं आहे. ते आता इस्ट लंडनमधील सँड्रिंगहम येथील त्यांच्या वैयक्तिक घरात शिफ्ट होणार आहेत.
ब्रिटनच्या राजाकडून घेण्यात आलेला हा निर्णय मॉडर्न ब्रिटीश इतिहासातील रॉयल फॅमिलीकडून घेण्यात आलेला सर्वात नाट्यपूर्ण निर्णय म्हणून संबोधला जात आहे.
पॅलेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, 'हा निर्णय अत्यंत गरजेचा होता. आम्ही त्यांच्या सतत आरोप फेटाळण्याची पाठराखण करत नाहीये. किंग चार्ल्स यांना एक गोष्ट स्पष्ट करायाची आहे की त्यांची पीडितांप्रती सहानभूती आहे आणि कायम राहणार आहे.
अँड्र्यू यांची कधीकाळी एक धडाडीचे नेव्ही ऑफिसर म्हणून ओळख होती. त्यांनी १९८० मध्ये झालेल्या अर्जेंटिनासोबतच्या फाल्कलँड्स युद्धात लष्करामध्ये आपली सेवा बजावली होती. मात्र लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर त्यांना २०११ मध्ये युकेचे ट्रेड अम्बॅसिडोर, २०१९ मध्ये राजेशाही कर्तव्यातून आणि २०२२ मध्ये लष्करी आणि राजेशाही पदांवरून दूर करण्यात आलं होतं. मात्र अँड्र्यू यांनी आपल्यावरील आरोप सतत फेटाळले आहेत.
जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) हे एक अमेरिकन अब्जाधीश फायनान्सर आणि सिद्ध झालेला बाल-लैंगिक गुन्हेगार (convicted child sex offender) होते. त्यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी (sex trafficking) करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि त्यासाठी एक मोठे नेटवर्क चालवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
२०१९ मध्ये ते फेडरल सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपाखाली अटकेत असताना तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला (त्यांनी आत्महत्या केल्याचे अधिकृतपणे घोषित झाले).
'एपस्टीन फाईल्स' हे जेफ्री एपस्टीनशी संबंधित कोर्टाचे आणि इतर कागदपत्रे आहेत, ज्यात अनेक उच्च-प्रोफाइल (High-Profile) लोकांची नावे नमूद आहेत. ही नावे प्रामुख्याने व्हर्जिनिया ज्यॉफ्रे (Virginia Giuffre) यांनी एपस्टीनच्या साथीदार घिसलेन मॅक्सवेल (Ghislaine Maxwell) विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यातील दस्तऐवजांमध्ये उघड झाली आहेत.
या कागदपत्रांमध्ये नाव येणे याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीने कोणतेही गैरकृत्य केले आहे किंवा त्यांना एपस्टीनच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती होती. या नावांचा उल्लेख विविध संदर्भात झाला आहे, जसे की त्यांनी एपस्टीनच्या घरी भेट दिली किंवा त्यांची मैत्री होती.
मस्क (Elon Musk) आणि ट्रम्प (Donald Trump) यांचे नाव कसे आले?
या स्कँडलमध्ये डोनल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क या दोघांची नावे वेगवेगळया कारणांनी आणि संदर्भांनी समोर आली आहेत.