पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून न्यूमोनियाशी झूंज देणारे पोप फ्रान्सिस ( Pope Francis) यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर सुरु असणार्या उपचारांमध्ये बदल करण्यात आले आहे. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असे वृत्त व्हॅटिकन न्यूजने होली सी प्रेस ऑफिसच्या घोषणेचा हवाला देत दिले आहे.
होली सी प्रेस ऑफिसच्या निवेदनानुसार, पोप फ्रान्सिस यांना ताप नाही. त्यांच्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या सामान्य आहे. ते स्वतः जेवत आहेत आणि श्वसन फिजिओथेरपीमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. शनिवारी (दि.१) दुपारी त्यांनी युकेरिस्ट स्वीकारले आणि प्रार्थनेत वेळ व्यतित केला.
पोप फ्रान्सिस यांना ब्राँकायटिस आणि न्यूमोनियासह फुफ्फुसांशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे दोन आठवड्यांपूर्वी रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २०१३ मध्ये पोप झाल्यानंतरचा हा त्यांचा चौथा रुग्णालयात दाखल कालावधी आहे आणि सर्वात जास्त काळ आहे. पोपने आयुष्यभर फुफ्फुसांच्या समस्यांशी झुंज दिली आहे, तरुणपणी त्यांना गंभीर न्यूमोनिया झाला होता, ज्यामुळे एका फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकावा लागला होता, असे 'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं होते.