Iran Political Unrest | इराणमध्ये आंदोलनांचा भडका; अमेरिकेशी शांतता कराराला कडवा विरोध

तेहरान, मशहद येथे नागरिक रस्त्यावर
Iran Political Unrest |
Iran Political Unrest | इराणमध्ये आंदोलनांचा भडका; अमेरिकेशी शांतता कराराला कडवा विरोध
Published on
Updated on

तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता करारावरून इराणमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, देशातील विविध शहरांमध्ये आंदोलनांचा भडका उडाला आहे. मशहद आणि तेहरानमध्ये झालेल्या निदर्शनांमुळे इराणमधील अंतर्गत राजकीय तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. आंदोलकांनी अमेरिकेसोबतच्या करारातील इराणचे प्रमुख वाटाघाटीकार असलेल्या परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि मोहम्मद बागेर गालिबाफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या दोघांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली जात आहे.

करारावरून संताप

मशहद शहरातील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. त्यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दूरचित्रवाणीवरील मुलाखतीत त्यांनी अमेरिकेसोबत शांतता कराराबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिल्यानंतर हा संताप उसळल्याचे सांगितले जाते.

करारावरून देशात फूट

हा शांतता करार लवकरच अंतिम टप्प्यात येऊ शकतो, असा दावा केला जात आहे. मात्र, इराणमधील कट्टरतावादी गटांनी या कराराला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हा करार इराणच्या हिताविरोधात असून, त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीवरील देशाचे नियंत्रण कमकुवत होऊ शकते. तसेच वाटाघाटीमध्ये इराणने जास्त तडजोडी केल्याचा आरोपही केला जात आहे. आंदोलकांनी म्हटले की, अराघची करत असलेला करार इराणसाठी लाजिरवाणा आहे. या करारामुळे अमेरिकेला अवाजवी आणि अनावश्यक सवलती मिळाल्या आहेत. गालिबाफ आणि अराघची यांनी राजीनामा द्यावा.

होर्मुझ सामुद्रधुनीवरून वाद

परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चेत असलेल्या करारात अमेरिकेच्या नौदल निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही इराणसाठी महत्त्वाचे दबाव साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानानंतरच देशांतर्गत विरोध अधिक तीव्र झाला असून, राजकीय वातावरण तापले आहे.

घोषणाबाजी, झेंडे आणि तीव्र नाराजी

इराणमधील फार्स वृत्तसंस्थेने प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये तेहरानच्या इब्न सिना चौकात एक रॅली काढल्याचे दिसते. तर अब्बास अराघची यांच्या विरोधात निषेधासाठी मशहद शहरातील परराष्ट्र मंत्रालयासमोरही अनेक लोक जमले होते. काळ्या पोशाखातील महिलांनी ‘अराघची यांचा मृत्यू असो’ अशा घोषणा देत निषेध नोंदवला. आंदोलकांनी लाल आणि काळे झेंडे फडकावत सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तेहरानमध्येही परराष्ट्र मंत्रालयाबाहेर नागरिकांनी ‘अराघची राजीनामा द्या’ आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गलीबाफ यांच्या विरोधातही घोषणा दिल्याचे व्हिडीओंमध्ये दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news