पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बांगलादेशाच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस ( Muhammad yunus) यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पत्रात, पंतप्रधान मोदी यांनी 1971 च्या मुक्ती युद्धाच्या ऐतिहासिक महत्त्वही अधोरेखित केले आहे. त्याचबरोबर भारत बांगलादेशसोबतचे संबंध मजबूत करण्यास 'प्रतिबद्ध' आहे; परंतु एकमेकांविषयी स्वारस्य आणि चिंतेचा विचार केला जाईल, अशा परस्पर संवेदनशीलतेवर आधारित संबंधांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
२६ मार्च रोजी बांगलादेश राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. एकीकडे बांगलादेशमधील अंतरिम सरकार बंगबंधू शेख मुजीबुरहमान यांचा वारसा पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पत्रात बांगलादेश मुक्ती युद्धाचा उल्लेख केला आहे.
बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालयाने शेअर केलेल्या संदेशात पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आणि लिहिले की, "बांगलादेश राष्ट्रीय दिन हा आपल्या सामायिक इतिहासाचा आणि त्यागाचा पुरावा आहे. या संबंधांनी आपल्या द्विपक्षीय भागीदारीचा पाया रचला आहे. बांगलादेशच्या मुक्ती युद्धाची भावना आपल्या संबंधांना मार्गदर्शन करत आहे. आपल्या लोकांना ठोस फायदे देत आहे. शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी आपल्या सामायिक आकांक्षा आणि एकमेकांच्या हितसंबंध आणि चिंता याबाबत परस्पर संवेदनशीलतेच्या आधारावर ही भागीदारी आणखी विकसित करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही या भागीदारीला पुढे नेण्यासाठी प्रतिबद्ध आहोत."
५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशात सत्तापालट झाला. कट्टरपंथी आणि समाजविघातक घटकांनी ढाका येथील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. या हल्ल्यापूर्वी शेख हसीना यांनी देश सोडला. त्यांना बहिणीसह भारतात आश्रय घ्यावा लागला. यानंतर देशात नोबेल पारितोषिक विजेते युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. तथापि, या काळात अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. याबाबत केंद्र सरकारने बांगलादेशकडे तीव्र चिंताही व्यक्त केली होती.