

पुढारी वृत्तसेवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय दौऱ्यासाठी सौदी अरेबिया पोहोचणार आहेत. या भेटीचे निमंत्रण क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी दिले आहेत. २०१६ आणि २०१९ नंतर पंतप्रधान मोदी यांचा सौदी अरेबिचा हा तिसरा दौरा आहे.
पंतप्रधान मोदी आज (मंगळवार) दुपारी जेद्दाला पोहोचतील. हा जेद्दा येथील कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा ४० वर्षातील हा पहिला दौरा आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी, भारत आणि सौदी अरेबिया किमान सहा सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षरी करतील. सौदी अरबचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याशी झालेल्या भेटीत पंतप्रधान मोदी हजशी संबंधित मुद्द्यांवर, विशेषतः भारतीय यात्रेकरूंच्या कोट्यावर चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले.
दोन्ही देशांमध्ये ज्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे, त्यात अंतराळ, ऊर्जा, आरोग्य, विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन, संस्कृती आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रातील करारांचा समावेश आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपशील निश्चित करण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत रियाधमध्ये बैठका सुरू होत्या. डझनभराहून अधिक सामंजस्य करारांवर चर्चा सुरू आहे, त्यापैकी काहींवर अधिकृत पातळीवर स्वाक्षरी केली जाईल.
पंतप्रधान मोदींच्या आगमनाच्या २४ तास आधी व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षणाशी संबंधित अतिरिक्त करारांना अंतिम स्वरूप देण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी, पंतप्रधान मोदी भारतीय कामगारांना कामावर ठेवणाऱ्या एका कारखान्याला भेट देतील. पंतप्रधान मोदींचा हा दौरा पुढील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यापूर्वी होत आहे.
सौदी अरेबियातील भारतीय राजदूत सुहेल अजाज खान म्हणाले की, जेद्दाह हे भारत आणि सौदी अरेबियामधील कनेक्टिव्हिटीसाठी एक अतिशय महत्त्वाचे शहर आहे कारण ते शतकानुशतके दोन्ही देशांमधील व्यापारासाठी एक प्रमुख बंदर आहे. ते मक्केचे प्रवेशद्वार देखील आहे. उमरा आणि हजसाठी येणारा प्रत्येक व्यक्ती प्रथम जेद्दाहला पोहोचतो आणि नंतर मक्काला जातो.
ते म्हणाले, हज ही एक महत्वाची यात्रा आहे. भारत सरकार याचा खूप गांभीर्याने विचार करते. अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय याच्या आयोजनाची व्यवस्था करते. व्दिपक्षीय चर्चेत या विषयावर विस्तृत चर्चा होते. हज यात्रेवरून भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये नेहमीच चांगला समन्वय राहिला आहे.
२०२३ मध्ये, सौदी अरेबियाचे युवराज नवी दिल्लीच्या राजकीय भेटीवर आले होते. त्यांनी G20 शिखर परिषदेला हजेरी लावली आणि भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या पहिल्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. भारत आणि सौदी अरेबियामध्ये जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत.