PM Modi France visit | १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांतून घडतोय नवा भारत : पंतप्रधान मोदी

PM Modi France visit
PM Modi France visit | १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांतून घडतोय नवा भारत : पंतप्रधान मोदीPudhari
Published on
Updated on

पॅरिस; वृत्तसंस्था : चांद्रयानाच्या यशस्वी झेपेपासून गावागावांत शेतीसाठी उडणाऱ्या ड्रोनपर्यंत भारताने गेल्या दशकात विकासाची नवी व्याख्या लिहिली आहे. हा बदल कोणत्याही एका व्यक्तीचा नसून १४० कोटी भारतीयांच्या आत्मविश्वासाचा आणि आकांक्षांचा परिणाम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आपल्या फ्रान्स दौऱ्यात पॅरिसमधील सल्ले प्लेयेल सभागृहात भारतीय समुदायाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भारताच्या वेगवान आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीचा गौरव केला.

देशातील प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते उघडल्याने आर्थिक समावेशनाची चळवळ उभी राहिली असून, डिजिटल क्रांतीमुळे बँकिंगसह विविध सेवा नागरिकांच्या बोटांच्या टोकावर उपलब्ध झाल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ग्रामीण भागात वेगवान इंटरनेट पोहोचणे आणि महिलांकडून शेतीसाठी ड्रोनचा वापर होणे ही नव्या भारताची ओळख असल्याचे ते म्हणाले. सुमारे ९० कोटी नागरिकांना डिजिटल हेल्थ आयडी देण्यात आल्याने आरोग्य सेवा अधिक सुलभ झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर गगनयान, भारतीय अंतराळ स्थानक, कृत्रिम बुद्धिमत्ता, अणुतंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील भारताच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी भारत-फ्रान्स भागीदारीचेही महत्त्व अधोरेखित केले. संरक्षण, अवकाश, अणुऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उच्चगती रेल्वे यांसारख्या क्षेत्रांत दोन्ही देश एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रवासी भारतीयांनीही देशाच्या विकासप्रवासात अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news