

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सेली शहरात आज (दि.१२) भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले. त्यानंतर पीएम मोदी आणि मॅक्रॉन यांनी आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी (ITER) प्रकल्पाला भेट दिली.
पहिल्या महायुद्धात बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोदींनी मार्सेली येथील कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशनने देखभाल केलेल्या मजारग्यूज वॉर स्मशानभूमीला भेट दिली. तर पंतप्रधानांनी पॅरिसमधील भारत-फ्रान्स सीईओएस फोरममध्ये भाषण करताना दोन्ही देशांमधील व्यवसायांमधील भागीदारीला प्रोत्साहन दिले. उत्पादन, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील प्रगती अधोरेखित करताना मोदींनी २०४७ पर्यंत 'विकसित भारत' च्या ध्येयाकडे देश वाटचाल करत असताना व्यवसायांना भारतीय बाजारपेठेत सामील होण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या मार्सेली शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करण्यास शहरातील लोकांनी मदत करण्याची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मोदी यांच्या तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्याचा हा शेवटचा दिवस आहे. फ्रेंच दौरा संपल्यानंतर, ते १३ फेब्रुवारीरोजी अमेरिका दौऱ्यावर रवाना होतील. दि. १० फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये भारतीय समुदायाने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले होते .
दरम्यान, मोदी यांनी एलिसी पॅलेसमध्ये राज्य प्रमुखांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या रात्रीच्या स्नेहभोजनाला हजेरी लावली. यावेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील सीईओ आणि शिखर परिषदेतील अनेक प्रतिष्ठित आमंत्रितांची उपस्थिती होती.