

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. अशा कारवाया भारताचा संकल्प कमकुवत करू शकत नाहीत. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन देशांमधील राजकीय तणाव वाढत असताना कॅनडातील एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. त्याचप्रमाणे आपल्या दुतावसातील अधिकाऱ्यांना धमकावण्याचे भ्याड प्रयत्न भयावह आहेत. अशा प्रकारचा हिंसाचार भारताचा संकल्प कधीही कमकुवत करू शकत नाही. कॅनडा सरकारने न्याय सुनिश्चित करावा आणि कायद्याचे राज्य राखावे अशी आमची अपेक्षा आहे.' असेही ते म्हणाले.
कॅनडामध्ये होत असलेल्या घडामोडींवर पंतप्रधान मोदींची ही पहिली प्रतिक्रिया आहे. सलग दुसऱ्या दिवशी खलिस्तान समर्थकांनी कॅनडातील एका हिंदू मंदिरावर हल्ला करून तेथील मंदिरात उपस्थित हिंदूंना जखमी केले. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात पोलीस उपस्थित होते, असा आरोप पीडितांनी केला आहे. मात्र त्यानंतरही त्यांच्यावर हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षानेही कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर खलिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध केला आणि भारत सरकारने हे प्रकरण कॅनडाकडे मांडावे, अशी विनंती केली.