

बीजिंग; वृत्तसंस्था : भारतात विकसित करण्यात आलेल्या सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची फिलिपिन्सने तैवानजवळ तैनाती केल्याने दक्षिण चीन समुद्रातील सामरिक समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तैनातीमुळे दक्षिण चीन समुद्र परिसरात चीन आणि फिलिपिन्समधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. फिलिपिन्स मरीन कॉर्प्सने देशाच्या उत्तरेकडील भागात ब्रह्मोस अँटी-शिप मिसाइलने सज्ज असलेली कोस्टल डिफेन्स युनिट सक्रिय केली आहे. ही युनिट लुझॉन आयलँडच्या वायव्य टोकावरील कॅम्प केप बोईयाडोर येथे तैनात करण्यात आली आहे. या ठिकाणाहून फिलिपिन्सला तैवान आणि चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होते. गरज पडल्यास ही प्रणाली रस्त्यांमार्गे पलावन आणि मिंदोरो यांसारख्या बेटांवर जलद गतीने हलवता येईल.
भारत-रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेले सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल
समुद्र, जमीन आणि हवाई प्लॅटफॉर्मवरून प्रक्षेपण शक्य
शत्रूच्या युद्धनौका आणि विमानवाहू नौकांवर अचूक प्रहार करण्याची क्षमता
दक्षिण चीन समुद्रात फिलिपिन्सच्या किनारी संरक्षण शक्तीत मोठी वाढ
अतिवेगामुळे जगातील अनेक संरक्षण प्रणालींना अडवणे कठीण
तज्ज्ञांच्या मते, या क्षेपणास्त्रांची तैनाती करण्यामागचा उद्देश दक्षिण चीन समुद्रात चीनच्या नौदलाच्या हालचालींवर लक्ष आणि नियंत्रण ठेवणे हा आहे. भविष्यकाळात तैवानविषयक संघर्ष उद्भवल्यास त्याचा परिणाम फिलिपिन्सवर होऊ शकतो. त्यामुळे हे युनिट उत्तरेकडील बेटांसाठी एक प्रकारे संरक्षण कवच म्हणून काम करेल.
या तैनातीमुळे फिलिपिन्सच्या मरीन फोर्सची समुद्री आक्रमक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लुझॉन आखात या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून चीनची नौदल जहाजे आणि विमानवाहू नौका वारंवार ये-जा करतात. त्यामुळे या भागात ब्रह्मोसची उपस्थिती चीनसाठी मोठे आव्हान मानली जात आहे. फिलिपिन्सने या तळावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा आणि सुरक्षित शेल्टर तयार करण्याचे कामही सुरू केले आहे.