ढाका : वृत्तसंस्था
संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यानंतर आता अवैध प्रवासी बांगला देशात परतण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांत अशा 300 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
बांगला देश बॉर्डर पोलिसांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत 300 हून अधिक लोकांना सीमेवरून बांगला देशात जाताना पकडण्यात आले आहे. चौकशीत या सर्वांनी ते बांगलादेशी असल्याचे सांगितले आहे; मात्र त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी काहीही दस्तऐवज नाहीत. 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात बांगला देश बॉर्डर पोलिसांनी एकूण 204 जणांना पकडले आहे. यात 78 महिला आणि 67 लहान मुलांचा समावेश आहे. 4-5 वर्षांपूर्वी ते भारतात गेल्याचे त्यांनी सांगितले आहे.