

palkistan donkey cart race tradition pakistan independence day viral video
पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानमध्ये अनेक अजब-गजब खेळ आणि पारंपरिक स्पर्धा आजही पाहायला मिळतात. कोंबड्यांच्या झुंजी, उंटांच्या शर्यती, कबुतरबाजी आणि पतंगबाजी यांसारख्या अनेक परंपरा अजूनही येथे लोकप्रिय आहेत. आता याच यादीत गाढवांच्या शर्यतीचाही समावेश आहे. नुकतीच कराचीमध्ये गाढवांच्या गाड्यांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जगात एक अशीही जागा आहे, जिथे गाढवांची शर्यत आयोजित केली जाते. हे ऐकल्यावर अनेकांच्या मनात पाकिस्तानचे नाव येऊ शकते. कारण येथे कोंबड्यांच्या झुंजीपासून अशा अनेक अनोख्या पारंपरिक स्पर्धा आजही सुरू आहेत. यावेळी चर्चा आहे ती पाकिस्तानमधील ‘गाढवांची शर्यत’ म्हणजेच डोंकी कार्ट रेसची. या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून अनेकजण ‘पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकतं’ अशा प्रतिक्रिया देत आहेत.
ही शर्यत १६ ऑगस्ट रोजी कराचीमध्ये आयोजित करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये गाढवे दोन चाकांच्या गाड्या ओढत रस्त्यावर वेगाने धावताना दिसत आहेत. शर्यत जिंकल्यानंतर एका व्यक्तीने आनंदाने आपल्या गाढवाला दोन्ही हातांनी मिठी मारली. त्यावेळी गाढवाने मोठे दात दाखवल्याने ते हसत असल्यासारखे दिसले. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोकही हसू लागले.
कराचीतील गाढवगाडीची शर्यत नेमकी काय आहे?
ही केवळ मनोरंजनासाठी आयोजित केली जाणारी शर्यत नाही. कराचीच्या जुन्या लोकसंस्कृतीचा हा एक भाग आहे. विशेषतः शहरातील लयारी (Lyari) परिसरात ही परंपरा लोकप्रिय आहे. ट्रेडिशनल स्पोर्ट्स अँड गेम्स पाकिस्तान असोसिएशननुसार, लयारीमधील लोकांनी अनेक दशकांपासून हा खेळ जिवंत ठेवला आहे.
या शर्यतीची सुरुवात १८व्या शतकातील औपनिवेशिक काळापर्यंत जात असल्याचा एक दावा केला जातो. त्या काळात कराचीच्या आसपासचे मच्छीमार आपल्या गाड्यांमधून शर्यती लावत असल्याचे सांगितले जाते. कराची साऊथ डोंकी-कार्ट असोसिएशनच्या प्रमुखांनीही एका जुन्या अहवालात याच परंपरेचा उल्लेख केला होता. त्यामुळे हा काही अलीकडचा छंद नसून, अनेक दशकांपासून सुरू असलेली परंपरा आहे.
शर्यतीसाठी गाढवांची विशेष तयारी
या शर्यतीत सहभागी होणारी गाढवेही सामान्य गाढवांसारखी नसतात. त्यांची विशेष तयारी केली जाते. प्रामुख्याने तरुण गाढवांची निवड केली जाते आणि शर्यतीपूर्वी त्यांना चांगले खाद्य व योग्य देखभाल दिली जाते.
गाढवांसाठी छोट्या आणि हलक्या गाड्याही विशेष पद्धतीने तयार केल्या जातात. अनेक मालक आपल्या गाढवांना हरभरा आणि शेंगदाणे खायला देतात. चांगली देखभाल आणि योग्य आहार हाच विजयाचा खरा मंत्र असल्याचे अनेक मालक मानतात.
दरवेळी वेगळा असतो शर्यतीचा मार्ग
या शर्यतीचा मार्ग प्रत्येक वेळी वेगळा राहिला आहे. एका पारंपरिक शर्यतीचा मार्ग गुलबाई/गुलबारी चौकापासून जहांगीर कोठारी परेडपर्यंत सुमारे ७ किलोमीटरचा होता.
२०२४ मध्ये झालेली शर्यत ICI ब्रिजपासून कमिश्नर कार्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली होती. त्यात ४० हून अधिक गाड्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी १६ ऑगस्ट रोजी झालेली शर्यत नेटिव्ह जेट्टी ब्रिजपासून सुरू होऊन कमिश्नर कार्यालयापर्यंत झाली. या मार्गाची लांबी सुमारे ५ ते ६ किलोमीटर होती.
गाढवांची नावंही असतात भन्नाट
लयारीमध्ये हा खेळ पूर्वीपासूनच लोकप्रिय आहे. यापूर्वी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, मुले आणि संपूर्ण कुटुंबे शर्यत पाहण्यासाठी येत असत. काही जण आपल्या आवडत्या गाढवावर पैजही लावत असत.
२०१४ मध्ये सिंध फेस्टिव्हलदरम्यान कराचीमध्ये तब्बल ५० गाढवांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या गाढवांची नावेदेखील भन्नाट ठेवण्यात आली होती. चिंगारी, एफआयआर, कॉम्प्युटर आणि डंपर अशी त्यांची नावे होती.
काळानुसार या खेळातील सहभागी आणि प्रेक्षकांची संख्या कमी होत गेली. २०२४ मध्ये अधिकाऱ्यांनीही सांगितले होते की, आर्थिक अडचणी असूनही लयारीमधील लोक ही परंपरा जपून आहेत. कदाचित याच कारणामुळे प्रशासनाकडून आता या पारंपरिक खेळाला पुन्हा प्रोत्साहन दिले जात आहे.
यावेळी झालेल्या शर्यतीनंतर कराचीच्या कमिश्नरांनी ही शर्यत आता दरवर्षी स्वातंत्र्यदिनी आयोजित केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
कराचीच्या रस्त्यांवर आजही दिसतात गाढवगाड्या
गाढवगाड्या कराचीच्या रस्त्यांवरून अद्याप गायब झालेल्या नाहीत. भारत-पाकिस्तानसारख्या देशांमध्ये वाहतुकीचे साधन म्हणून त्यांचा वापर जवळपास कमी झाला असला, तरी कराचीमध्ये आजही गाढवांचा वापर बांधकाम साहित्य, कृषी उत्पादने आणि कचरा वाहून नेण्यासाठी केला जातो.
अरुंद गल्ल्या आणि बाजारपेठांमध्ये मोठी वाहने पोहोचू शकत नाहीत. अशा ठिकाणी आजही गाढवगाड्या उपयोगी ठरतात. त्यामुळे जे गाढव रोज सामान वाहून नेतात, त्याच गाढवांनी याच दिवशी रेसिंग कार्ट ओढत कराचीच्या रस्त्यांवर वेगाची झलकही दाखवली.