

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तान आपल्या शस्त्रास्त्रांची भारताशी बरोबरी करण्याचे दावे करत असतो; पण त्यांची शस्त्रे त्यांनाच दगा देत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या पाकिस्तानच्या ‘शाहीन-3’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नियमित चाचणी सुरू होती. यादरम्यान एक भीषण अपघात झाला. पाकिस्तानचे क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर लगेचच दिशा भरकटले आणि बलुचिस्तान प्रांतातील अशांत डेरा गाझी खान येथील न्यूक्लियर साईटजवळ कोसळून त्याचा स्फोट झाला.
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही; परंतु अनेक ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि तेथील प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. रिपोर्टस्नुसार, क्षेपणास्त्र आपल्या निश्चित मार्गावरून भरकटले आणि कोसळले. यामुळे बलुचिस्तानच्या लोकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ही बातमी पसरू नये म्हणून पाकिस्तानी लष्कराने या भागात इंटरनेट सेवा बंद केली आणि माध्यमांनाही रोखले.
मंगळवार, दि. 22 रोजी पाकिस्तानने आपले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘शाहीन-3’ डेरा गाझी खानजवळील एका चाचणी स्थळावरून प्रक्षेपित केले. हे ठिकाण पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी एक प्रमुख प्रक्षेपणस्थळ मानले जाते. स्थानिक सूत्रांनुसार, क्षेपणास्त्र एक तर हवेतच फुटले किंवा प्रक्षेपणाच्या काही वेळातच कोसळले, ज्यामुळे त्याचे अवशेष जवळच्या नागरी वस्तीत पडले. या घटनेमुळे पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली आणि चाचणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यावेळी मोठा स्फोट झाल्याचेही ऐकू आले.
यादरम्यान झालेला स्फोट इतका मोठा होता की, त्याचा आवाज सुमारे 50 किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. बलुचिस्तानच्या अशांत भागापासून ते खैबर पख्तुनख्वापर्यंत आवाज पोहोचल्यानंतर गोंधळ उडाला. लष्कराने तत्काळ परिसरातील इंटरनेट बंद केले आणि लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला. मात्र, सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होऊ लागल्याने ही बातमी पसरली. हे क्षेपणास्त्र डेरा गाझी खान येथील न्यूक्लियर साईटजवळ पडल्याचा दावा केला जात आहे.