

काबुल; वृत्तसंस्था : युद्धबंदीचे उल्लंघन करून पाकिस्तानने शुक्रवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानात आणखी हवाई हल्ले केले असून, यात कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.
यासंदर्भात तालिबानने दावा केला आहे की, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हे हवाई हल्ले केले. जेथे हल्ले करण्यात आले ते ठिकाण दोन्ही देशांच्या सीमेजवळ आहे. अफगाणिस्तानातील वृत्तवाहिनी ‘टोलो न्यूज’च्या मते, या हल्ल्यात अर्गुन आणि बारमल जिल्ह्यांमधील अनेक घरांना लक्ष्य करण्यात आले. दोन्ही देशांत आठवडाभर चाललेल्या संघर्षानंतर बुधवारी संध्याकाळी दोन्ही देशांनी 48 तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती.
विशेष म्हणजे शनिवारी (दि. 18) दोहा या कतारच्या राजधानीत दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये आपसातील तणाव कमी करण्यासाठी चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी पाकिस्तानचे शिष्टमंडळ आधीच दोहा येथे दाखल झाले आहे. तत्पूर्वी, अफगाण सीमेजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार झाले आहेत.