

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये नवीन प्रशासकीय (administrative) प्रांत तयार करण्याच्या प्रयत्नांमुळे देशात मोठा राजकीय आणि घटनात्मक वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ थेट आमने-सामने आले आहेत. देशाचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या विधानानंतर हा वाद चव्हाट्यावर आला आहे. अनेक पाकिस्तानी पत्रकारांनी तर शाहबाज शरीफ यांचे सरकार लवकरच कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी अलीकडेच, देशाची प्रशासकीय चौकट पूर्णपणे कोलमडली आहे, असे सांगत प्रशासकीय संरचनेत मोठ्या बदलांची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. नक्वी हे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मात्र, या प्रस्तावावर विरोधक आणि विविध राष्ट्रवादी गटांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. प्रांतांच्या सीमा पुन्हा निश्चित केल्यास देशातील राजकीय आणि वांशिक मतभेद अधिक तीव्र होतील आणि १९७१ मध्ये ज्याप्रमाणे बांगला देशची निर्मिती झाली, तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या मते, पंजाब आणि सिंध यांसारख्या मोठ्या प्रांतांचा कारभार सांभाळणे प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय विभाग (युनिटस्) तयार केल्यास सुशासन आणि सरकारी सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवणे सुलभ होईल. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना या विषयावर सर्वसंमती घडवून आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच काही माध्यमांतील अहवालानुसार, अशांत असलेल्या बलुचिस्तान प्रांताचेही तुकडे करण्याची योजना आहे.