

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानी न्यूज चॅनेल्स व सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घातली होती. ऑपरेशन 'सिंदूर' दरम्यान ही कारवाई करण्यात आली होती. मात्र आता, कोणतीही अधिकृत घोषणा न करता ही बंदी मागे घेतल्याचे चित्र दिसत आहे.
सद्य:स्थितीत ही बंदी हटवण्यात आली असली, तरी केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बंदी तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे की कायमस्वरूपी मागे घेण्यात आली आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
2 जुलैपासून मावरा होसेन, युमना जैदी, सबा कमर, अहद रझा मीर, आणि दानिश तैमूर यांची खाती भारतीय युजर्सना पुन्हा दिसू लागली आहेत. बंदी दरम्यान भारतात ही खाती अॅक्सेस होत नव्हती. मात्र, अजूनही यावर सरकार किंवा माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की हे इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममधील एखादा तांत्रिक बिघाड असू शकतो.
याशिवाय, बंदीच्या काळात बंद केलेले काही मोठे यूट्यूब न्यूज चॅनेल्स – Hum TV, ARY Digital, Har Pal Geo – हे चॅनेल्स देखील भारतात पुन्हा सुरू झाले आहेत. यापूर्वी Dawn News, Samaa TV, Ary News आणि Geo News यांसह १६ चॅनेल्सवर भारत सरकारने बंदी घातली होती.
या चॅनेल्सवर भारताच्या विरोधात खोटे आणि चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्याचा आरोप होता. त्यामधून भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांबाबत दिशाभूल करणारे आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे मांडले जात होते, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली होती. या चॅनेल्सचा एकूण सबस्क्रायबर्सचा आकडा 63 दशलक्षांहून अधिक होता.
दुसरीकडे, फवाद खान, माहिरा खान आणि हानिया आमिर यांच्यासारखे 'A-लिस्ट' कलाकार अजूनही भारतात ब्लॉकच आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर भारतातून गेल्यास असा संदेश दिसतो: “भारतामध्ये हे अकाउंट उपलब्ध नाही. हा कंटेंट मर्यादित करण्याचा कायदेशीर आदेश आम्ही पाळला आहे.”