

पेशावर; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या पेशावर शहरात एका खासगी शाळेचे छत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ३४ विद्यार्थी आणि एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ५० हून अधिक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये १२ मुलींचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
पेशावरमधील अल खैर एज्युकेशन सेंटर या खासगी शाळेत गुरुवारी सकाळी नियमित वर्ग सुरू असताना ही दुर्घटना घडली. या प्रकरणी शाळेचे मालक मोहम्मद खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. शाळेची इमारत कमकुवत होती. कमकुवत संरचनेवर अतिरिक्त बांधकामाचा भार पडल्याने छत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शाळा मालकाने अलीकडे झालेल्या पावसामुळे छत कमकुवत झाल्याचा दावा केला आहे.
राज्यपालांकडून चौकशीचे आदेश
राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. खैबर पख्तूनख्वाचे राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनीही शोक व्यक्त करत घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधून काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तीन मुलांची प्रकृती चिंताजनक
लेडी रीडिंग रुग्णालयाच्या माहितीनुसार, जखमींमध्ये तीन मुलांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दुर्घटनेतून बचावलेल्या शिक्षिका माहविश झमान यांनी सांगितले की, छत कोसळले तेव्हा त्या वर्गात होत्या. त्या क्षणी जणू आभाळ कोसळल्याचा भास झाला. त्यानंतर शुद्ध हरपली आणि शुद्धीवर आल्यावर मी रुग्णालयात होते.
सहा महिन्यांतील चौथी मोठी दुर्घटना
गेल्या सहा महिन्यांत अशा चार मोठ्या दुर्घटनांची नोंद झाली आहे. जुलैमध्ये उमरकोट येथे सरकारी शाळेची भिंत कोसळून तीन मुलींचा मृत्यू झाला होता, तर लाहोरमध्ये बागबानपुरा परिसरात खासगी शाळेचा छत कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात लाहोरच्या कहना परिसरात एका शिकवणी केंद्राचे छत कोसळून १४ मुलांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यात डेरा गाझी खान येथे शाळेचा छत कोसळून चार मुलांचा मृत्यू झाला होता.
दोन मजले ढिगाऱ्याखाली; चार तास बचावकार्य
शाळेच्या वरच्या मजल्यावरील छत कोसळून खालील वर्गखोल्यांवर पडले. त्यामुळे इमारतीचे दोन मजले बाधित झाले आणि अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी चार तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू होते. बचाव विभागाचे प्रवक्ते आरिफ खट्टक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे.