

रियाद/इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संरक्षण करारानंतर आता दोन्ही देशांनी आणखी एक मोठा करार केला आहे. दोन्ही देश आता ‘सामायिक गुप्तचर यंत्रणा’ स्थापन करणार आहेत. गेल्या आठवड्यातच दोन्ही देशांमध्ये झालेल्या सामरिक परस्पर संरक्षण करारानंतर हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या कराराचा मुख्य उद्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाविरोधातील कारवाईमध्ये परस्पर समन्वय अधिक मजबूत करणे हा आहे.
या नव्या यंत्रणेंतर्गत एक समिती स्थापन केली जाईल, जी दोन्ही देशांतील उच्चपदस्थ अधिकारी, लष्करी कमांडर आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना संभाव्य धोक्यांपासून किंवा हल्ल्यांपासून संरक्षण देण्याचे काम करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत इस्लामाबाद आणि रियाददरम्यान एक ‘इंटेलिजन्स हॉटलाईन’ स्थापित केली जाणार आहे. यामुळे नियमितपणे आणि रिअल टाईममध्ये गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण करणे शक्य होईल, ज्यामुळे संवाद अविरतपणे सुरू राहील.