

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : एकीकडे गृहकलह, दुसरीकडे भारताचा भीषण हल्ला आणि ढासळलेली अर्थव्यवस्था अशा कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानने विद्यमान लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पदावरून हटविल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी शमशाद मिर्झा यांची नियुक्ती होऊ शकते. मुनीर यांनी वैयक्तिक अजेंडा राबविल्यामुळे आणि लष्करातील प्रचंड भ्रष्टाचारामुळे त्यांना हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचेही वृत्त आहे.
मुनिर यांच्यामुळेच पाकवर ही वेळ आल्याची भावना वाढत आहे. रात्री उशिरा मुनिर यांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मुनिर हे आत्मकेंद्री वृत्तीचे असून आपले महत्त्व वाढवण्यासाठीच त्यांनी पहलगाम हल्ला घडवून भारताची कुरापत काढल्याचे पाक सैन्यातील अधिकार्यांचेच मत आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांची सुटका करावी, अशी मागणी आता त्यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ या पक्षाने केली आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर इम्रान खान समर्थक आक्रमक झाले आहेत. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी इम्रान खान यांना तुरुंगातून बाहेर काढा. त्यांच्याकडे देशाची सूत्रे द्या, अशी मागणी समर्थकांनी केली आहे.
वॉशिंग्टन : युद्ध तातडीने थांबवा आणि भारताशी चर्चेसाठी सज्ज व्हा, अशा शब्दांत अमेरिकेने पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेले युद्ध थांबवून पाकिस्तानने भारतासोबत शांततेच्या वाटाघाटी सुरू कराव्यात, अशी अमेरिकेची भूमिका आहे. परिस्थिती चिघळवू देणे दोन्ही देशांच्या हिताचे नाही. याबाबत विशेषतः पाकने संयम बाळगावा.