इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर भारताविरोधात गरळ ओकत असताना, आता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सिंधू जलवाटप करारावरून भारताला इशारा दिला आहे. आमच्या देशाचा पाण्याचा एकही थेंब शत्रू देशाला (भारताला) आमच्यापासून आम्ही हिरावू देणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास पाकिस्तान तुम्हाला असा धडा शिकवेल, जो तुम्ही कधीच विसरणार नाही, अशी पोकळ धमकी त्यांनी दिली आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल रोजी भारताने पाकिस्तानसोबतच्या 65 वर्षे जुन्या सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती दिली. त्यावर टीका करताना इस्लामाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरीफ म्हणाले, भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर ते सिंधू पाणीवाटप कराराचे उल्लंघन ठरेल. पाणी ही पाकची जीवनदायिनी आहे आणि आंतरराष्ट्रीय करारानुसार, आमच्या हक्कांशी आम्ही तडजोड स्वीकारणार नाही. तसा प्रयत्न झाला, तर त्यास पाकिस्तानकडून निर्णायक उत्तर दिले जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली. भारताने त्यांच्या या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारताने सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती दिल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने गरळ ओकली जात आहे. पाणी रोखणे म्हणजे युद्धाला चिथावणी दिल्यासारखे मानले जाईल, असा इशारा दोनच दिवसांपूर्वी माजी मंत्री बिलावल भुट्टो यांनी दिला होता. तसेच, सिंधू नदीच्या पाण्यावर धरण बांधण्याचा प्रयत्न भारताने केला, तर ते धरण क्षेपणास्त्रांद्वारे उडवून दिले जाईल, असा इशारा लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी यापूर्वी दिला होता. यावर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना चोख उत्तर दिले.
दरम्यान, शाहबाज शरीफ यांच्या धमकीला हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. ओवैसी म्हणाले की, पाकिस्तानच्या या पोकळ धमक्यांचा भारतावर काडीमात्र परिणाम होणार नाही. पाकिस्तानी नेत्यांनी फालतू गोष्टी बोलण्याचे प्रयत्न करू नयेत. भारताला वारंवार युद्धाची धमकी देणार्या पाकिस्तानने हे लक्षात ठेवावे की, आमच्याकडे ‘ब्रह्मोस’सारखे ब्रह्मास्त्र आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये या क्षेपणास्त्राने पाकिस्तानमध्ये कसा हलकल्लोळ माजवला होता याचा विसर तुम्हाला पडू नये, असा हल्लाबोल ओवैसी यांनी केला.