Pakistan Protests | पाकमध्ये इम्रान खान समर्थकांवर गोळीबार

पीटीआयचा आरोप; खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर तणाव वाढला
Pakistan Protests  |
Pakistan Protests | पाकमध्ये इम्रान खान समर्थकांवर गोळीबार
Published on: 
Updated on: 

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांची निदर्शने हिंसक झाल्यानंतर खैबर पख्तूनख्वा प्रांतात राजकीय तणाव वाढला आहे. मंगळवारी पेशावरजवळील बारा बाजार परिसरात पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा आणि गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेत किमान पाच आंदोलक जखमी झाल्याचे ‘डॉन’ वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रपती यांनी रविवारी खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी जाहीर केली. येथे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सरकार होते. या सरकारचे अधिकार स्थगित करून संघराज्याची राजवट लागू करण्याच्या निर्णयामुळे पीटीआय समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. मंगळवारी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. काही आंदोलकांनी सरकारी इमारतींना आग लावल्याचे वृत्त आहे. सुरुवातीला पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी माघार घेत जवळच्या दुकानांमध्ये आश्रय घेतल्याचे स्थानिक वृत्तांत म्हटले आहे. त्यानंतर अश्रुधुराचा मारा आणि हवेत गोळीबार करून जमावाला पांगवण्यात आले. यावेळी ५० जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीटीआयचे सचिव इक्रम खताना यांच्या म्हणण्यानुसार, पेशावरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील बारा येथे राष्ट्रीय डेटाबेस आणि नोंदणी प्राधिकरणाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. जवळील सरकारी कार्यालयांमध्येही घुसखोरी करण्यात आली. दरम्यान, खैबर पख्तूनख्वा हा गेल्या १३ वर्षांपासून इम्रान खान यांच्या पक्षाचा प्रभाव असलेला प्रांत आहे. इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात आहेत. लष्करी ठिकाणांवरील दंगलींना चिथावणी दिल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांच्या पत्नीही तुरुंगात असून, त्यांच्या तीन बहिणींना सध्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. २०२२ मध्ये संसदेतील अविश्वास ठरावाद्वारे त्यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news