

वॉशिंग्टन/इस्लामाबाद : पाकिस्तानने अमेरिका-इराण संघर्षादरम्यान इराणच्या लष्करी विमानांना आपल्या रावळपिंडीतील हवाईतळावर लपवल्याचे वृत्त ‘सीबीएस न्यूज’ने प्रसिद्ध केले असून, त्यामुळे एकाच वेळी अमेरिका आणि इराणला चुचकारणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला असून, त्या देशाची पोलखोल झाली आहे. दरम्यान, ‘सीबीएस न्यूज’चा दावा पाकिस्तानने फेटाळून लावला.
‘सीबीएस न्यूज’ने अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देऊन प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एप्रिलमध्ये युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही दिवसांनी इराणने अनेक विमाने पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान हवाईतळावर पाठवली. हा हवाईतळ रावळपिंडीत असून, तो पाकिस्तानचा महत्त्वाचा लष्करी तळ मानला जातो. पाकिस्तानात पाठवलेल्या विमानांमध्ये इराणी हवाई दलाचे -130 विमानदेखील समाविष्ट होते. गुप्त कारवाया आणि टेहळणीसाठी ही विमाने वापरली जातात.
‘सीबीएस न्यूज’चे वृत्त प्रसिद्ध होताच पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ उडाली. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे वृत्त फेटाळून लावले. ‘सीबीएस न्यूज’शी बोलताना त्यांनी सांगितले की, नूर खान हवाईतळ शहराच्या मध्यभागी आहे आणि तिथे मोठ्या संख्येने विमाने लपवणे शक्य नाही.
दरम्यान, इराणने आपली काही नागरी विमाने अफगाणिस्तानलाही पाठवल्याचा दावा ‘सीबीएस न्यूज’ने केला आहे. ही विमाने काबूल विमानतळावर थांबली होती. नंतर ती अन्यत्र नेण्यात आली. मात्र, तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी याचा इन्कार केला.
पाकिस्तान एका बाजूला स्वतःला अमेरिकेसमोर मध्यस्थीसाठी प्रयत्न करणारा देश म्हणून सादर करत आहे. तसेच, दुसऱ्या बाजूला तो इराण आणि चीनला नाराज करणे टाळण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या दशकात पाकिस्तानचे चीनवरील लष्करी अवलंबित्व लक्षणीय वाढले आहे. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अहवालानुसार, 2020 ते 2024 दरम्यान पाकिस्तानला 80 टक्के मोठी शस्त्रे चीनने पुरवली.