

पुढारी ऑनलाईन डेस्क : NASA चे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 286 दिवस अवकाशात घालवल्यानंतर पृथ्वीवर पुनरागमन केले, मात्र त्यांना केवळ 1430 डॉलर (सुमारे 1.18 लाख रूपये) इतकेच ओव्हरटाईम वेतन मिळाले. यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी स्वतःच्या खिशातून दोन्ही अंतराळवीरांना 'ओव्हरटाईम' देण्याची तयारी दर्शवली आहे.
NASA च्या स्पेस ऑपरेशन्स मिशन डिरेक्टोरेटचे प्रवक्ते जिमी रसेल यांच्या माहितीनुसार, NASA मध्ये अंतराळवीरांना ओव्हरटाईम, सुट्टी किंवा वीकेंड वेतन मिळत नाही. ते सरकारी कर्मचारी असल्याने त्यांना फक्त "इन्सिडेंटल अलाऊन्स" (छोटे अनुदान) दिले जाते, जे अन्य सरकारी दौऱ्यांप्रमाणे परतफेड स्वरूपात मिळते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे.
ओव्हल ऑफिसमधील एका पत्रकार परिषदेत फॉक्स न्यूजचे पत्रकार पीटर ड्युसी यांनी अंतराळवीरांच्या कमी वेतनाचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले, "माझ्यापर्यंत हा विषय आधी कधीच आलेला नाही. पण गरज भासली, तर मी स्वतःच्या खिशातून पैसे देईन. त्यांनी ज्या परिस्थितीत काम केले, त्यासाठी हा खूपच कमी मोबदला आहे."
NASA च्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अब्जाधीश एलन मस्क आणि त्यांची कंपनी स्पेसएक्स यांचीही ट्रम्प यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले, "कल्पना करा, जर मस्क नसते, तर ते तिथे अजून अडकले असते. त्यांना आणण्यासाठी दुसरं कोण होतं?" दरम्यान, मस्क सध्या ट्रम्प प्रशासनात देखील कार्यरत आहेत.
दरम्यान, अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे GS-15 वेतन ग्रेड या नासाच्या सर्वोच्च वेतनश्रेणीत येतात. त्यांचे वार्षिक वेतन $125,133 ते $162,672 म्हणजेच सुमारे 1.08 कोटी रुपये ते 1.41 कोटी रुपये आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 9 महिने कार्यरत राहिल्यामुळे, त्यांना या कालावधीसाठी $93,850 ते $122,004 म्हणजेच सुमारे 81 लाख रुपये ते 1.05 कोटी रुपये इतका वेतन मिळेल. याशिवाय त्यांना अतिरिक्त $1148 (सुमारे 1 लाख रुपये) दिले जाण्याची शक्यता आहे. या सर्वाचा एकत्रित विचार करता, त्यांची एकूण कमाई अंदाजे $94,998 ते $123,152 म्हणजेच सुमारे 82 लाख रुपये ते 1.06 कोटी रुपये एवढी असेल.