

नवी दिल्ली : ‘आम्ही तुमच्या पदाबाबत एक कठीण बातमी शेअर करत आहोत. आज तुमच्या कामाचा शेवटचा दिवस आहे’, असा संदेश व्यवस्थापनाने अचानक दिला तर नोकरदार व्यक्तीची अवस्था काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा. पण आज ही वेळ ओरॅकल कंपनीच्या असंख्य कर्मचार्यांवर एकाच वेळी ओढवली आहे. कंपनी व्यवस्थापनाने सकाळी ६ वाजता आपल्या कर्मचार्यांना ई-मेलद्वारे तत्काळ सेवासमाप्तीची नोटीस बजावली आहे.
ओरॅकलच्या संदेशात पुनर्रचना व व्यावसायिक बदलांचे कारण देताना प्रभावित कर्मचाऱ्यांच्या संख्येचा उल्लेख मात्र नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, ओरॅकलच्या अज्ञात संख्येतील कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या टर्मिनेशन ई-मेलमध्ये ‘ओरॅकलच्या सध्याच्या व्यावसायिक गरजांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आम्ही व्यापक संस्थात्मक बदलांचा भाग म्हणून तुमची भूमिका/पद समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आज तुमचा शेवटचा कामाचा दिवस आहे, असे म्हटले आहे.
या संदेशात म्हटले आहे की, प्रभावित कर्मचारी ओरॅकलच्या सेव्हरन्स प्लॅनच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून ‘सेव्हरन्स पॅकेज’साठी (नोकरीवरून काढताना मिळणारी भरपाई) पात्र असतील. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेव्हरन्स व सेवासमाप्तीच्या तारखेच्या तपशिलासह त्यांच्या ओरॅकल ई-मेल पत्त्यावर ‘डॉक्युसाईन’कडून वेगळा ई-मेल प्राप्त होईल.
ई-मेलमध्ये प्रभावित कर्मचाऱ्यांना ‘तत्काळ कारवाई आवश्यक’ या शीर्षकाखालील विभागात कर्मचाऱ्यांना फॉलोअप माहिती मिळण्यासाठी वैयक्तिक ई-मेल पत्ता देण्यास सांगण्यात आले आहे. यात सेवासमाप्तीशी संबंधित दस्तऐवज समाविष्ट आहेत. सोबतच कर्मचाऱ्यांना ओरॅकलच्या सिस्टीमवरील ॲक्सेस बंद करण्याचा इशारा देताना कर्मचाऱ्यांना कंपनीची गोपनीय माहिती डाऊनलोड, कॉपी करणे किंवा स्वतःकडे ठेवणे (स्वतःला ई-मेल करण्यासह) निषिद्ध असल्याचे म्हटले आहे.
सकाळी सहा वाजताचा हा संदेश अशा वेळी आला आहे, जेव्हा ओरॅकल एआय आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च लक्षणीयरीत्या वाढवत असतानाच व्यापक पुनर्रचना करत आहे.
टीप : ओरॅकलने या टाळेबंदीची औपचारिक घोषणा किंवा टर्मिनेशन ई-मेल सार्वजनिकपणे जारी केलेला नाही. ‘बिझनेस इनसायडर’ने कंपनीकडून कर्मचार्यांना १४ सप्टेंबरला पाठवले ई-मेलचे वृत्त दिले असून, अनेक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांद्वारे त्याला पुष्टी मिळाली आहे.