

पुढारी ऑनलाईन डेस्क: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील 286 दिवसांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर परतल्यानंतर जगभरात सर्वत्र NASA चे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची चर्चा आहे. यातील सुनिता विल्यम्स या भारतीय मूळाच्या असल्याने तमाम भारतीयांना त्यांचा अभिमान वाटणे साहजिक आहे.
तथापि, केवळ सुनिता विल्यम्सच नव्हे तर इतरही भारतीय मूळाचे अंतराळवीर स्पेस सायन्स क्षेत्रात कार्यरत आहेत. कल्पना चावला यांनीही पूर्वी NASA साठी महत्वाची कामगिरी पार पाडली होती. भारतीय मूळाच्या अंतराळवीरांविषयी जाणून घेऊया. (Indian Origin Astronauts)
भारतीय वंशाच्या अंतराळवीरांनी NASA मध्ये आपली छाप सोडली आहे. या अंतराळवीरांनी केवळ मोठे यश मिळवले नाही, तर त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाने लाखो लोकांना प्रेरित देखील केले आहे. कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला होत्या. त्यांच्याशिवाय सुनिता विल्यम्स, सिरिशा बंदला, राजा चारी यांनीही NASA च्या अंतराळ मोहिमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
सुनिता यांचा जन्म अमेरिकेतील ओहायो येथे झाला. त्यांची आई उर्सुलिन बॉनी या स्लोव्हेनियन आहेत. तर वडील दीपक पंड्या हे मूळचे भारतातील गुजरातमधील. सुनिता यांनी फिजिक्समध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर यूएस नेव्हल अकॅडमीतून अभियंता पदवी मिळवली. 1998 मध्ये त्या NASA मध्ये जॉईन झाल्या.
त्यांनी विविध अंतराळमोहिमांमध्ये मिळून एकूण 608 दिवस आणि 20 मिनिटे इतका काळ अंतराळात व्यतित केला आहे. नुकत्याच त्या 286 दिवसांनंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. त्या आता एक अनुभवी अंतराळवीर बनल्या आहेत. शिवाय स्पेस वॉकचा विक्रमही सुनिता यांनी केला आहे. सुनिता यांनी अंतराळात एकूण 9 वेळा स्पेस वॉक केला आहे. यात एकूण 62 तास 06 मिनिटांचा स्पेसवॉक त्यांनी केला आहे.
अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला म्हणून कल्पना चावला यांचे नाव घेतले जाते. हरियाणातील कर्नाल येथे कल्पना यांचा जन्म झाला. त्यांना लहापणपासून आकाश-अवकाशाचे वेड होते. अमेरिकेत शिक्षण घेण्यापूर्वी त्यांनी भारतात एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. नंतर NASA जॉइन केले आणि डॉक्टर पदवी मिळवल्यानंतर त्या अंतराळवीर बनल्या. कल्पना चावला या स्पेस शटल कोलंबिया मिशनच्या सदस्य होत्या. त्यांनी अंतराळात मिशन स्पेशॅलिस्ट तसेच प्राईम रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून जबाबदारी पार पाडली होती. दुर्दैवाने 2003 मध्ये कोलंबिया अपघातात त्यांचे निधन झाले.
भारतातील आंध्र प्रदेशात जन्मलेल्या सिरिशा बांदला (वय 38) या भारतीय-अमेरिकन अंतराळवीर आहेत. सध्या त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. व्हर्जिन गॅलॅक्टिकमध्ये सामील होण्यापूर्वी तिने अंतराळ उद्योगात काम केले आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. 2021 मध्ये एका खासगी अंतराळ पर्यटन मोहिमेचा भाग म्हणून त्या अंतराळात गेली. अंतराळात गेलेली ती भारतीय वंशाची दुसरी महिला ठरली. अंतराळ संशोधनातील तिच्या समर्पणामुळे आणि कमर्शिअल अंतराळ उद्योगातील तिचे योगदान महत्वाचे आहे.
भारतीय वंशाचा अंतराळवीर राजा चारी (वय ४७) यांची NASA कडून निवड झाली होती. त्यांचा जन्म अमेरिकेतील असला तरी त्यांचे वडील मूळचे तेलंगणातील आहेत. राजा चारी यांनी यूएस एअरफोर्स अकादमीतून अभियंता म्हणून पदवी घेतली होती. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी एमआयटीमधून पूर्ण केले. एअरफोर्समध्ये पायलट म्हणून कार्यरत असताना ते अंतराळवीर म्हणून NASA मध्ये जॉईन झाले. त्यांनी 2021 मध्ये नासाच्या स्पेसएक्स क्रू-3 मिशनमध्ये सहभाग घेतला. यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात त्यांनी काम केले.