

प्योंगयांग; वृत्तसंस्था : उत्तर कोरियाने आपल्या अण्वस्त्र धोरणात मोठा बदल करत संविधानात नवे प्रावधान समाविष्ट केले आहे. देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांची हत्या झाली किंवा परकीय हल्ल्यात ते नेतृत्व करण्यास असमर्थ ठरले, तर उत्तर कोरिया तत्काळ अणुहल्ला करेल, अशी तरतूद नव्या धोरणात करण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही नवी तरतूद 22 मार्च रोजी प्योंगयांग येथे सुरू झालेल्या 15व्या सुप्रीम पीपल्स असेंब्लीच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आली. नंतर दक्षिण कोरियाच्या नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसने वरिष्ठ अधिकार्यांना याबाबत माहिती दिली. द टेलीग्राफच्या वृत्तानुसार मार्च महिन्यात तेहरानवर झालेल्या अमेरिका-इस्रायल संयुक्त हल्ल्यानंतर उत्तर कोरियाने हा निर्णय घेतला. या हल्ल्यात अली खामेनी आणि इराणमधील अनेक वरिष्ठ अधिकार्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर उत्तर कोरियामध्ये ‘डिकॅपिटेशन स्ट्राईक’ म्हणजेच देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करणार्या हल्ल्याची भीती वाढल्याचे सांगितले जात आहे. अशाच प्रकारचा हल्ला उत्तर कोरियाविरुद्ध होऊ शकतो, अशी भीती निर्माण झाल्यानेच संविधानात हा बदल करण्यात आल्याचे मानले जाते.
इराणवरील कारवाईने किम यांना धक्का
अमेरिका आणि इस्रायलने अतिशय वेगाने आणि अचूकपणे इराणी नेतृत्वावर केलेला हल्ला हा उत्तर कोरियासाठी ‘वेक-अप कॉल’ ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इराणवरील हल्ल्यामुळे उत्तर कोरिया अत्यंत सावध झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या डिकॅपिटेशन स्ट्राईकची क्षमता पाहून प्योंगयांगमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.