Nobel Economics Prize : मोकीर, ॲगिऑन आणि हॉविट यांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर
Nobel Economics Prize : यंदाच्या नोबेल पारितोषिक हंगामातील अंतिम नोबेल आज जाहीर झाले. यावर्षी अर्थशास्त्रातील नोबेल मोकीर, ॲगिऑन आणि हॉविट यांना जाहीर झाला आहे. अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी या तिघांनाही ‘नवप्रवर्तन-प्रेरित आर्थिक वाढ स्पष्ट केल्याबद्दल’ हा बहुमान दिला जात आहे.
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार १९६८ पासून
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराला औपचारिकपणे 'अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्रामधील बँक ऑफ स्वीडन पुरस्कार' असे म्हटले जाते. स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (Central Bank) हा पुरस्कार नोबेल यांच्या स्मरणार्थ १९६८ पासून सूरु झाला. तेव्हापासून हा पुरस्कार एकूण ९६ विजेत्यांना ५६ वेळा प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये केवळ तीन विजेत्या महिला होत्या.
यंदा 'या' दिग्गजांनी उमटवली नोबेल पुरस्कारांवर मोहोर
२०२५ चा पहिला नोबेल पुरस्कार सोमवार,( दि.6 ) जाहीर झाला. वैद्यकशास्त्रातील पुरस्कार मेरी ई ब्रुन्को, फ्रेड रॅम्सडेल आणि डॉ. शिमोन साकागुची यांना 'बाह्य रोगप्रतिकारशक्ती सहनशीलता' (peripheral immune tolerance) संबंधीच्या शोधांसाठी देण्यात आला. मंगळवारी (दि. ७) भौतिकशास्त्रातील पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना त्यांच्या 'सबअॅटॉमिक क्वांटम टनेलिंग' या अद्भुत जगावरील संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमू किटागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम. याघी यांना ‘मेटल-ऑरगॅनिक फ्रेमवर्कच्या विकासासाठी’ जाहीर झाला. साहित्यातील नोबेल हंगेरीचे लेखक लास्झ्लो क्रास्झ्नाहोर्काई यांना जाहीर झाला. तर व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना माचाडो यांना २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कारांचे वितरण १० डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात होणार आहे.

