US-Israel Iran War | अमेरिकेच्या अटींवर चर्चा नाही : इराण

पाक लष्कर प्रमुखांना भूमिका सांगितली; मध्यस्थामार्फत चर्चा सुरू राहणार
US-Israel Iran War  |
US-Israel Iran War | अमेरिकेच्या अटींवर चर्चा नाही : इराण
Published on
Updated on

इस्लामाबाद, तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिकेने आखलेल्या अटींनुसार वाटाघाटींमध्ये तेहरान सहभागी होणार नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत; पण आम्ही शरणागती पत्करणार नाही, अशी ठाम भूमिका इराणने घेतली आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून चर्चा होतील. सध्या तरी थेट चर्चा होणार नाहीत, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

चर्चेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि त्यांचे जावई जॅरेड कुशनर शनिवारी सकाळी पाकिस्तानकडे रवाना होणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली होती. मात्र, इराणने थेट चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने प्रत्यक्षात शनिवारी रात्रीपर्यंत ते रवाना झाले नव्हते. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी इस्लामाबाद भेटीदरम्यान पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर, पंतप्रधान शाहबाझ शरीफ, परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी चर्चा करत इराणची भूमिका मांडली. तेहरानच्या वाटाघाटीतील मागण्या आणि अमेरिकेच्या मागण्यांबाबतची भूमिका पाकिस्तानी अधिकार्‍यांसमोर मांडली, असे चर्चेत सहभागी असलेल्या एका पाकिस्तानी सूत्राने शनिवारी रॉयटर्सला सांगितले.

जे. डी. व्हान्स यांच्याशी चर्चेस अनुकूल

आतापर्यंत अराघची आणि अमेरिकन अधिकार्‍यांमध्ये कोणतीही थेट बैठक निश्चित झालेली नाही. दरम्यान, प्रादेशिक कूटनीतीचा विस्तार होत असल्याचे दिसत असून अनेक देशांच्या देखरेखीखाली इराणच्या अणुकार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी पाकिस्तानने एक योजना प्रस्तावित केल्याचे सूत्रांनी अल अरेबियाला सांगितले. इराणी अधिकार्‍यांना अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्यासोबत चर्चा करण्यास अधिक प्राधान्य आहे.

ट्रम्प यांचा दावा; इराणकडून प्रस्ताव येणार

ट्रम्प यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इराण अमेरिकेच्या अटी मान्य करण्यासाठी प्रस्ताव देणार असल्याचा दावा केला; मात्र त्या प्रस्तावाचा तपशील अद्याप स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनीही इराणला इशारा देत म्हटले की, इराणकडे अजूनही योग्य निर्णय घेण्याची संधी आहे. त्यांनी अर्थपूर्ण आणि पडताळणीयोग्य पद्धतीने अण्वस्त्र कार्यक्रम सोडला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news