

न्यूयॉर्क : केवळ आपल्या सुंदर हातांच्या जोरावर न्यूयॉर्कची अविशा तेवानी मॉडेलिंग करते. विशेष म्हणजे, ती दररोज जवळपास 2.5 लाख कमावते. या कामात तिला आपला चेहरा दाखवण्याचीही गरज नसते. मात्र, यासाठी तिला आव्हानात्मक परिस्थितींना तोंड द्यावे लागते.
35 वर्षीय अविशा तेवानीने 2020 मध्ये हँड मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. एका नातेवाईकाच्या लग्नाच्या फोटोशूटमध्ये मदत केल्यानंतर तिने आपले फोटो एका एजंटकडे पाठवले. अवघ्या एक-दोन आठवड्यातच तिला पहिले काम मिळाले. तेव्हापासून तिने मोठ्या कंपन्यांसोबत काम केले आहे. आपले हात निर्दोष आणि सुंदर ठेवण्यासाठी अविशाला तिच्या दैनंदिन जीवनात अनेक मोठे बदल करावे लागले आहेत. ती सांगते, मला माझ्या सिटी बाईकची सदस्यता सोडावी लागली; कारण पूर्वी एका अपघातात माझ्या कोपर आणि मनगटात फ्रॅक्चर झाले होते. त्याचप्रमाणे, तिला बॉक्सिंग सोडावे लागले. याव्यतिरिक्त, हातांची त्वचा चांगली राहावी म्हणून ती कोणताही व्यायाम करताना हातमोजे घालते. भांडी धुताना ती हातमोजे वापरते. शूटिंगवेळी तिला 2 ते 12 तास काम करावे लागते.