न्यूयॉर्क : अमेरिकेतील पेन स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी एक अत्याधुनिक श्वास सेन्सर विकसित केला आहे. हा श्वास सेन्सर मधुमेह व प्रीडायबेटिसचे निदान अवघ्या काही मिनिटांत करू शकतो. यामुळे वेळखाऊ व महागड्या रक्त तपासण्यांची गरज उरणार नाही. हा सेन्सर श्वासातील सिटोनचे प्रमाण मोजतो.
सामान्य व्यक्तींच्या श्वासात सिटोन कमी असते. परंतु मधुमेही रुग्णांमध्ये ते 1.8 भाग प्रति दशलक्षपेक्षा जास्त असते. हा सेन्सर ग्राफिन व झिंक ऑक्साईडपासून बनवला असून, तो अत्यंत सच्छिद्र असल्यामुळे सिटोनचे रेणू सहज पकडतो. तसेच श्वासातील आर्द्रतेवर मात करण्यासाठी खास थर वापरण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सिटोन मोजले जाते. हे उपकरण हलके, स्वस्त आणि वापरण्यास सोपे आहे. फक्त एका पिशवीत (बॅग) श्वास सोडून काही मिनिटांत निकाल मिळू शकतो. संशोधक पुढील टप्प्यात हा सेन्सर थेट नाकाखाली किंवा मास्कमध्ये कसा वापरता येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत.