

Netanyahu Modi Viral Video: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज त्यांचा डिनर आहे. यावेळी स्वागत करताना मित्र नेतन्याहू यांनी नरेंद्र मोदी यांना अश्चर्याचा धक्का दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ वर्षानंतर दुसऱ्यांदा इस्त्रायल दौऱ्यावर गेले आहेत. तिथं त्यांना इस्त्रायलच्या संसदेचा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. नरेंद्र मोदी क्नेसेट मेडल हा पुरस्कार मिळवणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
दरम्यान, नेतन्याहू यांनी ट्विट केलं की, 'आमच्या संयुक्त डिनरपूर्वी मी माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आश्चर्याचा धक्का दिला. मी भारतीय पारंपरिक वेशभूषा केली होती.' या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उत्तर दिलं आहे. त्यांनी, खरोखरच अप्रतिम! तुमचे भारतीय वेशभूषेबद्दलअसलेलं प्रेम, समृद्ध संस्कृती आणि परंपरेबाबतचा आदर दिसून येत आहे.' असं ट्विट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दौऱ्यावेळी इस्त्रायलच्या संसदेत विशेष सत्रात भाषण करणार आहेत. इस्रायल संसदेत भाषण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र संबोधत त्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास हल्ल्यानंतर इस्त्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
नेतन्याहू म्हणाले, 'पंतप्रधान आणि राष्ट्राचे प्रमुख हे क्नेसेट इथं येतात त्यावेळी आमच्यासाठी तो खूप उत्साहाचा क्षण असतो. मात्र माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदी यांची भेट माझ्यासाठी विशेष आहे. तुम्ही इस्त्रायलचे खूप चांगले मित्र आहात. जागतिक स्तरावरील दिग्गज नेते आहात. तुम्ही मित्रापेक्षाही आमचे भाऊ आहात.'
यावेळी नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१७ च्या भेटीची आठवण काढली. ते म्हणाले, 'आम्ही आमचे शूज काढून समुद्र किनाऱ्यावर फिरलो होतो. आम्ही पाण्यावर चाललो नाही मात्र चमत्कार केला होता.' नेतन्याहू यांनी हमास हल्ल्यानंतर भारतानं इस्त्रायलला समर्थन दिल्याचा मुद्दा अधोरेखित केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील पहिल्या नेत्यांपैकी एक होते ज्यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता.
नेतन्याहू म्हणाले की, '७ ऑक्टोबरच्या त्या भनयाक हल्ल्यापासून कायमच तुम्ही इस्त्रायलला नैतिक पाठिंबा दिला आहे. तुम्ही यापासून जराही मागे हटला नाही. तुम्ही इस्त्रायल आणि ज्यू लोकांसोबत उभे आहात यासाठी तुमचे आभार मानतो.'