

काठमांडू; वृत्तसंस्था : नेपाळमध्ये समाज माध्यमांवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने काठमांडूमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान 18 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, तर 200 जण जखमी झाले आहेत. निषेध करणार्यांमध्ये तरुण आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
नेपाळ सरकारने गेल्या शुक्रवारपासून फेसबुक, यूट्यूब आणि एक्स (ट्विटर) सारख्या 26 समाज माध्यमांवर बंदी घातली आहे. हिंसाचार पसरवणे, सामाजिक सलोखा बिघडवणे, या हेतूने सुरू असणार्या समाज माध्यमांवर ही बंदी घातली आहे, असे सरकारने म्हटले आहे. या बंदीविरोधात हजारो तरुण, विद्यार्थी ‘जनरेशन झेड’च्या बॅनरखाली एकत्र आले आणि त्यांनी काठमांडूमधील संसदेच्या इमारतीसमोर निषेध सुरू केला.
मोर्चा नंतर हिंसक बनला. काही आंदोलकांनी संसदेच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार, अश्रुधुराचे गोळे आणि रबर बुलेटचा वापर केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी नंतर थेट गोळीबार केला.
काही आंदोलकांनी सांगितले की, आम्ही केवळ समाज माध्यमांवरील बंदीविरोधात नाही, तर नेपाळमध्ये वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातही निषेध करत आहोत. सरकारचा हा हुकूमशाही द़ृष्टिकोन आहे, असेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले.