Nepal Gen Z Protest :
नेपाळमधील आंदोलन दुसऱ्या दिवशीही थांबण्याचं नाव घेत नाहीये. सरकारनं सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतला. मात्र तरी देखील नेपाळमधील जेन झींनी हे रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. जेन झी यांनी हे आंदोलन सुरू करताना पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भ्रष्टाचारचा मुद्दा नेपाळमध्ये खूप गंभीर झाला आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी काल संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला होता. आज त्यांनी राष्ट्रपती राम चंद्रा पौडेल यांचे निवसस्थान पेटवलं.
दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन नियंत्रणात येत नाही हे पासून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे देखील वृत्त आलं आहे. जेन झींच्या या अभूतपूर्व आंदोलनामुळं सरकारचे धाबे दणाणले आहेत. सरकारनं सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे असा आरोप करत युवा पिढी रस्त्यावर उतरली.
पंतप्रधानांच्या जवळच्या सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान ओली हे दुबईला पळून जाण्याचा विचार करत आहेत. यासाठी ते वैद्यकीय कारण पुढं करण्याची शक्यता आहे. यासाठी हिमालय एअरलाईन्सचं एक शासगी विमानाला देखील स्टँडबायवर राहण्यास सांगितलं आहे. ओली यांनी यापूर्वीच आपले कार्यकारी अधिकार हे उपपंतप्रधानांना दिले आहेत.
दुसरीकडं देशात पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढत आहे. त्यातच कालच्या आंदोलनात जवळपास २० आंदोलनकर्त्यांना मृत्यू झाला आहे. नेपाळमधील सध्याची स्थिती अराजकतेकडं झुकलेली आहे. सरकारमधील अनेक मंत्री हे स्वतःहून राजीनामा देत आहेत. देशातील अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
नेपाळची राजधानी काठमांडू इथं आंदोलक दगडफेक करत आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. पोलीस देखील आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलकांनी राष्ट्रपतींचे घर पेटवून दिलं असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचबरोबर नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहाल उर्फ प्रचंड यांच्या देखील निवसस्थानावर हल्ला करण्यात आला आहे.