Nepal Protest Against Social Media Ban :
भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये देशातील Gen Z चं मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. देशातील असंख्य तरूण भ्रष्टाचार आणि सरकारनं सोशल मीडियावर घालेल्या बंदीविरूद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. यात १४ व्यक्तीचा मृत्यू झाला असून नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. शहराच्या अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
नेपाळ सरकारनं आंदोलनाविरूद्ध लष्कराला पाचारण केलं आहे. हा निर्णय ज्यावेळी आंदोलकांनी प्रतिबंधित झोनमध्ये शिरकाव केल्यानंतर घेण्यात आला. आंदोलक संसदेच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर प्रशासनानं कर्फ्यू लागू केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी वॉटर कॅननचा वापर केला. तसंच अश्रू धुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या. काही ठिकाणी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना रबर बुलेटचा देखील वापर करावा लागला.
मात्र आंदोलन अधिकच तीव्र होत असून आंदोलकांनी झाडाच्या फांद्या आणि पाण्याच्या बॉटल्स भिरकावण्यास सुरूवात केली आहे. आंदोलक सरकारविरूद्ध घोषणाबाजू करत असून काही आंदोलकांनी संसदेचं कुंपन ओलांडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती अजूनच हाताबाहेर गेली.
रस्त्यावरील स्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून काठमांडू जिल्हा प्रशासनानं कर्फ्यूचा कालावधी वाढवला आहे. यापूर्वी राजधानीतील बनेश्वर भागात कर्फ्यू लागू होता. मात्र आता शहरातील अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला असून सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवासस्थानाची सुरक्षा देखील वाढवली आहे. याबाबतचं वृत्त काठमांडू पोस्टनं दिलं आहे.
नेपाळमधील Gen Z आंदोलन हे सरकारच्या एका निर्णयानंतर पेटलं. सरकारनं ४ सप्टेंबर रोजी २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. यात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप आणि यूट्यूब या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा देखील समावेश आहे. यासाठी कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयात नोंदण करण्यात या सर्व कंपन्या अयशस्वी ठरल्याचं कारण पुढे करण्यात आलं.
मात्र आजच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांच्या हातात नेपोटिजम आणि भ्रष्टाचारविरोधी फलके दिसली. त्यावरून नेपाळमधील तरूण पिढी ही देशातील भ्रष्टाचार आणि परिवारवाद याच्याविरूद्ध आंदोलन करत असल्याचं दिसून येत आहे.