Nepal Floods | नेपाळमधील मृतांचा आकडा ९०३; आपत्तीच्या १२ दिवस आधी इशारा दिल्याचा चीनचा दावा

Nepal Floods |
तिबेट : भूस्खलनग्रस्त भागात पीडितांचा शोध घेताना श्वानपथकासह बचाव कर्मचारी.
Published on
Updated on

काठमांडू; वृत्तसंस्था : नेपाळमधील विनाशकारी महापुरानंतर चीनने हिमनद्यांची हालचाल, पाण्याची पातळी, हिमस्खलन आणि भूस्खलनासारख्या धोक्यांची पुरेशी माहिती वेळेत दिली नसल्याचा आरोप नेपाळने केला आहे. मात्र, चीनने हे आरोप फेटाळून लावत आपत्तीच्या १२ दिवस आधीच नेपाळला अतिवृष्टी, भूस्खलन आणि अचानक पूर येण्याचा इशारा ई-मेलद्वारे दिल्याचा दावा केला आहे. दरम्यान, नेपाळमधील महापुरात मृतांची संख्या ९०३ वर पोहोचली असून तिबेटमधील १६ मृतांसह एकूण मृतांचा आकडा ९१९ झाला आहे. चार हजारांहून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या जागतिक हवामान केंद्राने २६ ऑगस्टच्या आपत्तीच्या तब्बल १२ दिवस आधी नेपाळला ई-मेल पाठवून अतिवृष्टी, भूस्खलन आणि अचानक पूर येण्याच्या संभाव्य धोक्याची माहिती दिली होती. नेपाळ आणि चीनच्या अधिकाऱ्यांची २७ मे रोजी काठमांडूमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत हवामान, हिमनद्या आणि त्यांच्याशी संबंधित नैसर्गिक धोक्यांवर चर्चा झाली. हिमनद्यांमध्ये होणारी प्राथमिक हालचाल आणि संभाव्य धोके यांची माहिती आधीच उपलब्ध करून देण्याची मागणी नेपाळने केली होती. मात्र, नेपाळच्या एका सरकारी जलतज्ज्ञाने चीनकडून अतिवृष्टीचा अंदाज दिला जात असला, तरी हिमस्खलन, पाण्याची पातळी, भूस्खलन आणि इतर गंभीर नैसर्गिक धोक्यांशी संबंधित माहिती पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचा आरोप केला.

ओळख पटविण्यासाठी डीएनए

मृतदेह सापडत असल्याने त्यांची ओळख पटविणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे. बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांकडून डीएनए नमुने घेतले जात आहेत.

अनेक देश मदतीसाठी पुढे

भारत, ब्रिटन, युरोपीय संघ, कॅनडा, अमेरिका आणि चीनने नेपाळला मदतीची घोषणा केली आहे. भारताने मानवी मदतीसोबत वैद्यकीय, फॉरेन्सिक आणि टनल रेस्क्यू पथके पाठविली आहेत. ब्रिटनने ५० लाख पौंड, युरोपीय संघाने २० लाख युरो, कॅनडाने ५० लाख कॅनेडियन डॉलर आणि अमेरिकेने पाच लाख डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. चीनने आपत्कालीन मदत आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. आध्यात्मिक गुरू सद्‌गुरू जग्गी वासुदेव यांनी नेपाळच्या आपत्ती निवारण निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न

महापुरामुळे वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला होता. प्रभावित भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. नुवाकोटमधील सुमारे ९० टक्के प्रभावित भागांत वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचे सांगितले जात आहे. रसुवा परिसरात दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. संस्थात्मक सौरऊर्जा यंत्रणा तसेच सौर दिव्यांचीही व्यवस्था केली आहे.

बोगद्यांमध्ये बचावकार्य

महापुरामुळे नेपाळमधील अनेक जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये मातीचा ढिगारा आणि चिखल शिरल्याने मोठ्या संख्येने कर्मचारी अडकले आहेत. त्रिशूली-3ए सह अनेक प्रकल्पांच्या सुरंगांचे प्रवेशमार्ग ढिगाऱ्यामुळे बंद झाले आहेत. बोगद्यात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेपाळच्या सुरक्षा दलांसोबत भारत आणि चीनमधील तज्ज्ञांची पथकेही मदत करत आहेत. जड यंत्रसामग्रीच्या मदतीने मलबा हटवून मार्ग मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बचावकार्याबरोबर अंत्यसंस्कारही सुरू

1. महापुरानंतर बचाव आणि मदतकार्य सुरू असतानाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कामही सुरू आहे. नेपाळच्या विविध भागांत सापडलेले मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.

2. मोठ्या संख्येने मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याने सामूहिक अंत्यसंस्कार आणि दफनविधी करावे लागत आहेत. चितवनमध्ये जंगल परिसरात सामूहिक दफनस्थळी मृतदेह नेण्यात आले. नुवाकोटमध्येही कुटुंबीयांनी नदीकाठी मृतांवर अंत्यसंस्कार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news