

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळमध्ये शनिवारी (दि.21) पहाटे तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजली गेली. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 59 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाची नोंद अक्षांश 29.17 एन आणि रेखांश 81.59 ई 10 किलोमीटर खोलीवर झाली. याची माहिती वृत्तसंस्था 'एएनाआय'ने त्यांच्या सोशल मीडिया हँडस एक्सवर ट्वीट करत दिली आहे.
यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये नेपाळमध्ये दोनदा भूकंप झाला होता. 1 एप्रिल 2023 रोजी डोखला जिल्ह्यातील सुरी येथे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. येथील नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, काठमांडूपासून 180 किमी पूर्वेला डोलाखा येथे सकाळी 11.27 वाजता (स्थानिक वेळेनुसार) 5.2 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. ओखलढुंगा, रामेछाप, सिंधुपाल चौक आणि नुवाकोट जिल्ह्यात तसेच काठमांडू खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर 28 एप्रिल 2023 रोजी रात्री भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू बाजुरा येथील डहाकोट येथे होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 आणि 5.9 इतकी होती.
एप्रिल 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला. या कालावधीत, अंदाजे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला. तर अंदाजे 22 हजार जखमी झाले. या भूकंपामध्ये 8 लाखांहून अधिक घरे आणि शाळा इमारतींचे नुकसान झाले.
आयआयटी कानपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि भूविज्ञान अभियांत्रिकीतील तज्ज्ञ प्रा. जावेद एन मलिक यांच्या मते, 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 ते 8.1 तीव्रतेचे भूकंपही झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळ होता. हिमालय पर्वतरांगातील अस्थिर टेक्टोनिक प्लेट्समुळे भूकंपाचे धक्के जाणवत राहणार आहेत, असे त्यांच्या अभ्यासामध्ये आढळून आले.