भूकंपाने म्यानमारमध्ये विध्वंस; १६४४ बळी, ३४०० जखमी

Myanmar earthquake | दळणवळण आणि संदेशवहन यंत्रणा पूर्णपणे मोडकळीस
Myanmar earthquake
भूकंपाने म्यानमारमध्ये विध्वंस; 1644 बळी, 3400 जखमीfile photo
Published on
Updated on

रंगून/बँकॉक : वृत्तसंस्था

म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपाची भीषणता आता स्पष्ट होऊ लागली आहे. 1,644 हून अधिक जणांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत असून, अजून इमारतींच्या राड्यारोड्याचे असंख्य ढिगारे उपसायचे राहिले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या काही पटींनी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंडाले शहरात हानीची तीव्रता मोठी आहे. तेथील 20 पदरी महामार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. दळणवळण आणि संदेशवहन यंत्रणा पूर्णपणे मोडकळीस आल्याने परिस्थितीचे वास्तव चित्र दुसर्‍या दिवशीही पूर्णपणे स्पष्ट होऊ शकले नाही. म्यानमारमध्ये सुमारे 3,400 जखमींवर उपचार सुरू आहेत.

या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या, पूल पडले आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः, मंडाले शहरात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. हे शहर म्यानमारमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर असून, तेथील लोकसंख्या 17 लाखांहून अधिक आहे. तेथील रुग्णालये जखमींनी भरून गेली असून, मोकळ्या मैदानात उपचार सुरू आहेत. रुग्णांवर उपचार करून आम्ही थकलो आहोत. मात्र, काम करत राहण्याला पर्याय नाही. रुग्णांचा ओघ थांबायचे नाव घेत नाही, असे एका डॉक्टरांनी सांगितले.

म्यानमारच्या सैन्यशासित प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, देशात किमान 1,644 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 3,400 लोक जखमी झाले आहेत. बँकॉकमध्येही 10 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

सर्वात भीषण भूकंप

भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते, हा भूकंप म्यानमारमध्ये गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठा होता. या भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की, केंद्रबिंदूपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या बँकॉकमधील इमारतींचेही मोठे नुकसान झाले.

मंडालेमध्ये एक प्राचीन बौद्ध पगोडा पूर्णपणे कोसळून त्याचा शब्दश: ढिगारा झाला आहे. म्यानमारच्या सर्वाधिक प्रभावित मंडाले प्रदेशात किमान 694 लोकांचा मृत्यू झाला असून, जवळपास 1,700 लोक जखमी झाले आहेत.

मठही कोसळला. एक भिक्षू मृत्युमुखी पडला. काही लोक जखमी झाले, आम्ही काहींना ढिगार्‍याखालून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. आरोग्यसेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा गंभीररीत्या प्रभावित झाल्या आहेत.

मैदानात उपचार

सरकारने भूकंपाने सहा प्रदेशांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. राजधानी नायपीतॉच्या प्रमुख रुग्णालयात परिस्थिती इतकी वाईट होती की, जखमींवर उघड्या मैदानात उपचार करावे लागले. एका अधिकार्‍याने याला मोठ्या प्रमाणातील जखमींचे क्षेत्र असे वर्णन केले.

भारताकडून आपत्कालीन रुग्णालय

विमानाने आपत्कालीन रुग्णालय पाठवण्यात आले. याशिवाय नौदलाच्या दोन जहाजातून मदत साहित्य पोहोचवण्यात आले. लष्कराचे 118 जणांचे मेडिकल टास्क फोर्स, आपत्कालीन पुनर्वसन पथकही पाठवण्यात आले. लष्कराच्या मेडिकल टास्क फोर्सचे नेतृत्व लेफ्ट. कर्नल जगजित गील करत आहेत. येत्या 48 तासांत आणखी मदत पोहोचवण्यात येत आहे.

विमानतळाचे नुकसान; आरोग्यसेवेवर न सोसवणारा भार

रंगून : वृत्तसंस्था

भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या म्यानमारमध्ये जागतिकस्तरावरून मदत देण्याची तयारी सुरू झाली आहे. भारताचे पहिले विमान आले आहे. मात्र, विमानतळाचे नुकसान झाल्याने वेळेत मदत पोहोचणेही मुश्कील झाले आहे. अशी अभूतपूर्व स्थिती आम्ही पाहिली नाही, असे स्थानिक सांगत आहेत. प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी कधीही अशी परिस्थिती पाहिली नाही. आम्ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत; पण मी खूप थकलो आहे, असे एका डॉक्टरने सांगितले. एका रहिवाशाने सांगितले की, एक रुग्णालय आणि हॉटेल पूर्णपणे नष्ट झाले.

विमानतळाचे नुकसान

या भूकंपामुळे विमानतळाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. म्यानमारमध्ये 2021 च्या लष्करी उठावानंतर सुरू झालेल्या चार वर्षांच्या गृहयुद्धाने आधीच आपत्ती निवारण आणि आरोग्यसेवा प्रणाली खिळखिळी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news