

पुढारी ऑनलाईन : म्यानमारमध्ये शुक्रवारी (दि.२८) झालेल्या भूकंपातील ( Myanmar earthquake ) मृतांचा आकडा 3000 पेक्षा अधिक झाला आहे. दरम्यान, म्यानमारच्या सत्ताधारी लष्कराने देशातील सशस्त्र गटांबराेबर सुरु असलेल्या संघर्षावर तात्पुरती बंदी जाहीर केली आहे, असे वृत्त 'AFP'ने दिले आहे.
भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते, हा भूकंप म्यानमारमध्ये गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठा होता. या भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की, केंद्रबिंदूपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या बँकॉकमधील इमारतींचेही मोठे नुकसान झाले.मंडालेमध्ये एक प्राचीन बौद्ध पगोडा पूर्णपणे कोसळून त्याचा शब्दश: ढिगारा झाला आहे. म्यानमारच्या सर्वाधिक प्रभावित मंडाले प्रदेशात किमान 694 लोकांचा मृत्यू झाला असून, जवळपास 1,700 लोक जखमी झाले आहेत.
७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात आतापर्यंत २८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लष्करी नेत्यांनी बुधवारी (दि. २) रात्री उशिरा सरकारी टेलिव्हिजन 'एमआरटीव्ही'वर युद्धबंदी जाहीर केली. शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे बाधित झालेल्या लोकांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी २२ एप्रिलपर्यंत लढाई थांबवली जाईल. लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या सशस्त्र गटांनी जाहीर केलेल्या एकतर्फी तात्पुरत्या युद्धबंदीनंतर ही घोषणा करण्यात आली. लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या सशस्त्र गटांनी राज्यावर हल्ला करणे आणि पुन्हा एकत्र येणे टाळावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मान्यमार लष्कराने दिला आहे. म्यानमारच्या लष्कराने २०२१ मध्ये आंग सान सू की यांच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता हस्तगत केली. आता देशात लष्करी राजवटीविरोधात सशस्त्र प्रतिकारात रूपांतर झाले आहे.
शुक्रवारी दुपारी झालेल्या भूकंपात हजारो इमारती, पूल कोसळले, रस्ते उखडले गेले आहेत. मृतांचा आकडा २८०० वर पोहोचला, तर ४,५०० हून अधिक लोक जखमी झाले, असे 'एमआरटीव्ही'ने वृत्त दिले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे ३० लाखांहून अधिक लोकविस्थापित झाले आहेत. दरम्यान, भारतासह अनेक राष्ट्रांनी म्यानमारमध्ये मदत आणि बचाव कर्मचारी पाठवले आहेत; परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पायाभूत सुविधा आणि तुटलेल्या दळणवळणामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तसेच गृहयुद्धामुळे मदत कार्याला अडथळा निर्माण होत आहे.
भूकंपामुळे म्यानमारचा शेजारील थायलंड देशालाही धक्का बसला आहे. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक उंच इमारत कोसळली. बुधवारी पहाटे ढिगाऱ्यातून एक मृतदेह काढण्यात आला. बँकॉकमध्ये भूकंपबळींची संख्या २२ झाली आणि ३५ जण जखमी झाले.