

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी आता अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात मोठी मालमत्ता खरेदी केली आहे. ‘रिअलडील’ या प्रॉपर्टी न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, अंबानी यांनी न्यूयॉर्कच्या पॉश ट्रायबेका परिसरात 11 ह्यूबर्ट स्ट्रीट येथील एक इमारत तब्बल 1.74 कोटी डॉलर्स (सुमारे 145 कोटी रुपये) मोजून खरेदी केली आहे.
विशेष म्हणजे अंबानी यांनी न्यूयॉर्कमधील आपले एक घर विकल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी ही नवी खरेदी केली आहे. ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार, ऑगस्ट 2023 मध्ये अंबानी यांनी मॅनहॅटनच्या वेस्ट व्हिलेजमधील आपले 9 दशलक्ष डॉलर्स किमतीचे घर विकले होते. हडसन नदीच्या काठावर असलेले हे दोन बेडरूमचे आलिशान घर होते.
ही मालमत्ता रिलायन्स इंडस्ट्रीजची अमेरिकेतील उपकंपनी ’ठखङ णडअ’ने खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या इमारतीचे मागील मालक, अब्जाधीश रॉबर्ट पेरा यांनी 2018 मध्ये ही इमारत सुमारे 2 कोटी डॉलर्सना खरेदी केली होती. त्या तुलनेत अंबानींच्या कंपनीने कमी किमतीत हा सौदा केला आहे. 47 वर्षीय पेरा यांनी ही इमारत खरेदी केल्यानंतर त्या जागी 17,000 चौरस फुटांचे आलिशान घर बांधण्याची योजना आखली होती.