

ब्राझील : जगभरातील लोक डासांमुळे त्रस्त असताना ब्राझीलमध्ये एक अशी फॅक्टरी सुरू झाली आहे, जिथे दर आठवड्याला कोट्यवधी डास तयार केले जातात. हे ऐकून विचित्र वाटेल; पण हे डास माणसांना त्रास देण्यासाठी नव्हे, तर डेंग्यूसारख्या घातक आजाराला संपवण्यासाठी बनवले जात आहेत.
ब्रिटिश बायोटेक कंपनी ऑक्सिटेकद्वारे चालवल्या जाणार्या या प्रयोगशाळेत एडीस इजिप्ती प्रजातीचे डास वाढवले जातात. मात्र, या डासांमध्ये वोल्बाचिया नावाचा एक विशिष्ट बॅक्टेरिया (जीवाणू) टाकला जातो. हा बॅक्टेरिया डासांच्या शरीरातील डेंग्यूच्या विषाणूला नष्ट करतो. जेव्हा हे लॅबमधील डास जंगलातील सामान्य डासांसोबत प्रजनन करतात, तेव्हा हा उपयुक्त बॅक्टेरिया त्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये पसरतो. यामुळे डेंग्यूचा प्रसार करणार्या डासांची संख्या नियंत्रित करण्यास मदत होते. हा डेंग्यू नियंत्रणाचा एक अभिनव उपाय मानला जातो.