

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संपूर्ण जगाचे लक्ष आता चीनच्या उत्तरेकडील तियानजिन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात होणार्या बैठकांकडे लागले आहे.
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यापूर्वी मोदींची शी जिनपिंग यांच्यासोबत बैठक पार पडली. अमेरिकन आणि युरोपीय माध्यमांनी आधीच तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे की, जर व्यापार प्रकरणी भारत आणि चीन रशियासोबत एकत्र आले तर काय होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरमध्ये भारताच्या दौर्यावर येणार आहेत आणि यामुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये नक्कीच तणाव वाढणार आहे.
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार भारताप्रती आक्रमक भूमिका घेत आहेत; तर दुसरीकडे भारत शांत मुत्सद्देगिरी करत आहे. मोदी सध्या जपानमध्ये आहेत. जपानने पुढील दहा वर्षांत भारतात 10 ट्रिलियन येनची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे. मोदींनी शनिवारी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत बुलेट ट्रेनमधून प्रवास केला.
दरम्यान, चीनने अमेरिकेचे ट्रेझरी बाँडस् विकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे 35 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त कर्जाचा सामना करणार्या अमेरिकन सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. मूडीज आणि फिचसह तीन प्रमुख रेटिंग एजन्सींनी अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केले आहे. तियानजिन येथील शांघाय शिखर परिषद चीनचे एक मोठे जागतिक प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे, ज्यात 20 देशांचे नेते आणि 10 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी होणार आहेत. बहुध्रुवीय जगात चीन आणि भारताने संवाद वाढवणे हा एक तर्कसंगत पर्याय असल्याचे ग्लोबल टाईम्स या चिनी दैनिकाने म्हटले आहे. जागतिक व्यापारात ट्रम्प यांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी चीन आहे, हे काही गुपित नाही. अमेरिकेचा चीनसोबत 650 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वस्तू आणि सेवांचा व्यापार आहे. याच कारणामुळे प्रबळ इच्छा असूनही ट्रम्प चीनवर मोठे आयात शुल्क लादू शकले नाहीत. दुसरीकडे रशिया हा देखील अमेरिकेचा जुना प्रतिस्पर्धी आहे. अनेक प्रयत्नांनंतरही युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी पुतीन यांना राजी करण्यात ट्रम्प अयशस्वी ठरले. पुतीन आपल्या स्वतःच्या उद्दिष्टांवर काम करत आहेत.
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मोदी, जिनपिंग आणि पुतीन यांच्या छायाचित्रासह दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शी जिनपिंग यांच्यासाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. ही परिषद केवळ औपचारिक भेट नाही. यात मध्य आशियातील 20 हून अधिक नेते सहभागी होत आहेत. यानंतर बीजिंगमध्ये चीन आपल्या नवीन क्षेपणास्त्रांचे आणि लढाऊ विमानांचे लष्करी संचलनही करणार आहे. जिनपिंग इतिहास, मुत्सद्देगिरी आणि लष्करी सामर्थ्य एकत्र करून जगाची ती व्यवस्था बदलू इच्छितात, ज्यावर आतापर्यंत अमेरिकेचे वर्चस्व राहिले आहे.
भारत-अमेरिका संबंध जुने आहेत आणि काही महिन्यांपूर्वीपर्यंत ट्रम्प-मोदी संबंध चांगले होते. पण आपल्या आक्रमक वृत्तीमुळे ट्रम्प यांनी आपले मित्र मोदी यांनाच आपला प्रतिस्पर्धी बनवले. या बिघडत्या संबंधांवर चीन बारकाईने लक्ष ठेवून होता. त्याने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आणि मोदींनी तो स्वीकारला. यात पुतीन यांनी सकारात्मक भूमिका बजावली.